
सुमारे 17 कोटी हिंदुस्थानी नागरिकांचा खासगी डेटा चोरून तो विकणाऱ्या टोळक्याला अटक करण्यात आली आहे. या टोळीत सात जणं असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिली आहे.
या टोळक्याने गेल्या दोन वर्षांत 16.8 कोटी हिंदुस्थानी नागरिकांचा खासगी डेटा चोरला. हा डेटा त्यांनी जस्ट डायल आणि अन्य सेवा पुरवठादार कंपन्यांकडून चोरला होता. यात नागरिकांची खासगी आणि आर्थिक व्यवहारांची माहिती होती. त्यात अनेक कंपन्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी आणि संरक्षण दलातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या डेटाचोरीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न झाला असून हेरगिरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या टोळीच्या दिल्ली येथील तळावरून त्यांना अटक करण्यात आली. याच ठिकाणाहून या टोळीने 2021पासून लोकांचा डेटा चोरायला सुरुवात केली होती. या माहितीत नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, पॅन कार्ड नंबर, बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे तपशील, मासिक उत्पन्न, कर्ज आणि विमा अशांचा समावेश होता. यात नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे तपशीलही आढळले आहेत. या प्रकरणी नितिश भूषण, पूजा पाल, सुशील तोमर, अतुल प्रताप सिंग, मुस्कान हसन, संदीप पाल आणि झिया उर रहमान अशा सात जणांना अटक करून हैदराबाद येथे आणण्यात आलं.
दोन महिन्यांपूर्वी सायबराबाद पोलीस स्टेशनमध्ये एका माणसाने तक्रार दाखल केली होती. त्याच्या खासगी माहितीचा तपशील सार्वजनिकरित्या उपलब्ध झालेला त्याला दिसत होता. त्यावरूनच त्याने ती तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ही टोळी संबंधित डेटा हा डेटा मार्ट इन्फोटेक, ग्लोबल डेटा आर्ट्स आणि एमएस डिजिटल ग्रो या तीन अनोंदणीकृत कंपन्यांना 50 हजार लोकांच्या माहितीसाठी 2 हजार रुपये किंमतीला विकत असल्याचं आढळलं आहे.