जगभरामध्ये माझी 100 हून अधिक जैविक मुलं असल्याचा दावा करणारे टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. फ्रान्समधील पॅरिस शहराबाहेरील बार्गेट विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. टीएफ1 टीव्ही आणि बीएफएम टीव्हीने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. खासगी जेटने अझरबैजानच्या दिशेने रवाना होत असताना पावेल दुरोव यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कथितरित्या मनी लॉण्डरिंग, ड्रग्स तस्कारी आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील व्हिडीओ शेअर करण्यासाठी केला जात होता. या अॅपवर 39 वर्षील पावोल दुरोव यांचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे यांच्याविरोधात फ्रान्स पोलिसांनी अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट जारी झाल्यापासून ते फ्रान्स आणि युरोपमध्ये जाणे टाळत होते.
Telegram founder Paul Durov detained at French airport
Read @ANI Story | https://t.co/3auqzDrHJs#PaulDurov #Telegram #Frenchairport pic.twitter.com/SBfA7EgZ56
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2024
टेलिग्रामचे संस्थापक, सीईओ पावेल डुरोव हे रशियन वंशाचे आहेत. 2014 मध्ये त्यांनी रशिया सोडली आणि 2021 मध्ये त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व घेतले. आता त्यांना अॅपद्वारे होणारी गुन्हेगारी रोखण्यास अपयश आल्याने अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेसंदर्भातील वृत्तावर टेलिग्राम, फ्रान्सचे गृहमंत्रालय आणि पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशिया, युक्रेन आणि पूर्व सोव्हियत संघाच्या देशांमध्ये टेलिग्राम अॅपचा फेसबूक, युट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि वीचॅटनंतर सर्वाधिक प्रभाव पहायला मिळतो. जगभरात या अॅपचे 90 कोटींहून अधिक युझर्स आहेत. आगामी काळात 100 कोटी लोकांना या अॅपशी जोडण्याची कंपनीचे टार्गेट आहे.
2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यापासून दोन्ही देशांमध्ये या अॅपचा वापर वाढला. राजकीय आणि सैन्य हालचालींसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील संवादाचे हे प्रभावी माध्यम आहे.