प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह

2114

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीही घरात अडकले आहेत. याच दरम्यान हैदराबाद येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री विश्वशांति हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विश्वशांति हिचा मृतदेह तिच्या हैदराबाद येथील घरात आढळून आला आहे. हैदराबाद येथे ती एस आर नगरमध्ये रहात होती. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी विश्वशांति हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. विश्वशांति इमारतीच्या पाचव्या मजल्यावर रहात होती. बऱ्याच वेळापासून ती घरातून बाहेर न दिसल्याने शेजारील लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ एसआर नगर येथे येऊन तपास केला असता विश्वशांती हिचा मृतदेह घरात आढळून आला. तिचा मृत्यू नक्की कसा झाला? ही हत्या की आत्महत्या? याबाबत पोलीस तपास करत आहे.

कोण होती विश्वशांती?
विश्वशांती मूळची विशाखापट्टनम येथील रहिवासी होती. तिने तेलुगू भाषातील अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केलेली आहे. दरम्यान, तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर कोरोनामुळे तिचा मृत्यू झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत. मात्र यास दुजोरा मिळालेला नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या