दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, एक कोटींचा मुद्देमाल जप्त

43

सामना प्रतिनिधी । जालना

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पोलीसांनी दरोडा करणारे सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून एक कोटी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना खबऱ्याने देऊळगावराजा रोडवरील आकाश पेट्रोलपंप टेंभुर्णी येथे दरोडा पडल्याची माहिती दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भागवत, कर्मचारी क्षीरसागर, त्र्यंबक सातपुते, प्रदीप धांडगे, गजेंद्र भुतेकर, नवनाथ राऊत, धनंजय जगदाळे हे घटनास्थळी पोहचले. पोलीस आल्याचे दरोडेखोरांना कळताच अंधाराच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन उद्धव बापुराव शिंदे (रा. बावी. ता. वाशी जि. धाराशिव) आणि नितीन बापुराव पवार (रा. तेरखेडा ता. वाशी. जि. धाराशिव) या दोघांना अटक केली.

दरम्यान, दरोडेखोरांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या एकूण चार ट्रक ज्यामध्ये अशोका लेलॉड कंपनीचे तीन व एक टाटा कंपनीचा डिझेल उपसा करण्यासाठी आणलेले हॅड्रोलिक पंप, सेकशन पाईप, डिझेल भरण्यासाठी आणलेले कॅनी असा एकूण एक कोटी पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करुन तपास चालू आहे. या दरोडेखोरांकडून राज्य व परराज्यामध्ये सदर प्रकारचे गुन्हे करणारे रॅकेड उघड होण्याची शक्यता असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भागवत करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या