मंदिर शिखर

353

<< वास्तुरहस्य > > बबनराव पाटील

मंदिर पीठिका (जगती) आणि मंदिर भित्तिकेनंतर (मण्डोवर) महत्त्वाचा भाग असतो तो मंदिराच्या शिखराचा. मंदिराच्या छताच्या किनाऱयावर (मोल्डिंगवर) एकापेक्षा अधिक छोटय़ा-छोटय़ा शिखरांची निर्मिती करता येते. यालाच उरूश्रृंग असेही संबोधतात. उरूश्रृंग हे मुख्य शिखराचे तेरा भाग करून त्यातील सात भागांएवढय़ा उंचीचे असते. त्यानंतर बांधले जाणारे पुढील स्तरावरील उरूश्रृंग अलीकडील उरूश्रृंगाचे तेरा भाग करून त्यातील सात भागांच्या उंचीचे असते. मंदिराचे शिखर बनवताना शिखरपीठिकेचे दहा भाग केल्यास सहा भाग लांबीचे शिखरस्कंध म्हणजेच कळसाकडील पृष्ठभागाचा विस्तार असतो.

शिखरस्कंधानंतर ग्रीवा, आमलसार, कलश या रचना महत्त्वाच्या असतात. या तीन रचनांना एकत्रितरीत्या पद्मकोश असे म्हणतात. शिखरस्कंधापासून पद्मकोशाच्या अंतिम बिंदूपर्यंतच्या उंचीचे सात भाग केल्यास एक भाग ग्रीवा, दीड भाग आमलसार, दीड भाग पद्मपत्र व तीन भाग उंचीचा कलश बनवतात. आमलसारकाच्या विस्ताराच्या निम्मी त्याची उंची असते. शुकनासिका म्हणजे पोपटाच्या चोचीप्रमाणे असणारा भाग. मंदिराच्या शिखरावर व्याघ्रमुख, सिंहमुख यांची स्थापना केल्यास तो आकार पोपटाच्या चोचीप्रमाणे दिसतो. यास शुकनासिका असे म्हणतात.

मंदिराच्या शिखर पृष्ठभागाशी ध्वजाधाराची संरचना केली जाते. ध्वजाधार, कळसाच्या पृष्ठभागाशी स्थापित करतात. मंदिर पूर्वाभिमुख असल्यास ध्वजाधार ईशान्येस तर पश्चिमाभिमुख असल्यास नैऋत्य कोपऱयात ध्वजाधार असावा असे शास्त्र्ा सांगते. मंदिराच्या पीठिकेपासून (जगतीपासून) कळसाच्या टोकापर्यंतच्या उंचीच्या एक तृतीयांश उंचीचा ध्वजदंड श्रेष्ठ मानला जातो. चतुर्थांश उंचीचा मध्यमान व अष्टमांश उंचीचा कनिष्ठ मान असणारा असतो. ध्वजदंड मंदिराच्या विस्ताराच्या लांबीचा असावा, असाही एक पाठ आहे. या लांबीच्या दशांश कमी केल्यास मध्यमान ध्वजदंड आणि पंचमांश कमी केल्यास कनिष्ठमान ध्वजदंड मानतात. एक हाथ विस्ताराच्या मंदिराचा ध्वजदंड पाऊण अंगुल जाडीचा असावा. ध्वजदंडासाठी दृढ, भरीव लाकडाचा वापर करतात ज्यावर कोणत्याही गाठी नसतात. ध्वजदंडाच्या पुढील पृष्ठभागावर (दूरस्थ भागावर) मर्कटी (पाटली) स्थापन केली जाते. मर्कटीचा वरील भाग अर्धचंद्राकृती ठेवतात व याच्या दोन्ही बाजूस दोन घंटय़ा लावल्या जातात.
ध्वजाची लांबी ध्वजदंडाच्या प्रमाणात ठेवतात. ध्वजाची रुंदी ध्वजदंडाच्या अष्टांश ठेवली जाते. ध्वज विविध वर्णी व विविध वस्त्र्ाांनी बनवतात. ध्वजास पुढे तीन ते पाच शिखा असतात. कोणतेही मंदिर ध्वजरहित असू नये.

अनेक मंगलप्रसंगी कलशस्थापना केली जाते. मंदिरशिखरावरही कलश स्थापन करण्याची परंपरा आहे. कलशाच्या उंचीचे नऊ भाग केल्यास त्यातील एका भागाची ग्रीवा (पीठ), तीन भागांचे अंडक, एक भाग कलशपृष्ठ, त्यावर एक भागाची कर्णिका व शेवटी तीन भागांचे बीजपूरक बनवतात. कलशाची उंची कमी अधिक करता येते.

दरवाजाच्या उंचीचे द्वारमध्यात चौसष्ट भाग करून त्यातील वरून पच्चावन्नाव्या भागात देवतेची दृष्टी असली पाहिजे असे एकमत आहे. एक मत असेही आहे की द्वारमध्यातून दरवाजाचे आठ विभाग केल्यास त्यातील वरचा आठवा भाग सोडून द्यावा. त्याखालील सातव्या भागाचे पुनः आठ विभाग करून त्या आठ विभागातील वरचा विभाग सोडून खालचा जो सातवा विभाग त्यास गज आय असे म्हणतात. या विभागावार देवतांची दृष्टी असावी.

लक्ष्मीनारायणाची दृष्टी ठरवताना द्वारमध्याशी आठ विभाग करून त्यातील वरून सहाव्या भागाचे पुन्हा आठ विभाग करावेत व त्यातील वरून पाचव्या विभागावर लक्ष्मीनारायण देवतेची दृष्टी असावी. शयनासन देवता, जलशायी देवता अथवा शिवलिंगाची दृष्टी दरवाजाच्या मध्यभागात असावी. सूर्य पंचायतन मंदिरात मध्यभागी सूर्यप्रतिभा व प्रदक्षिणाक्रमाने गणेश, विष्णू, चण्डीदेवी व महादेवाची स्थापना करतात. गणेश पंचायतन मंदिरात देवतांच्या मध्यस्थानी श्रीगणेश, त्यानंतर प्रदक्षिणा क्रमाने चंडी, महादेव, विष्णू व सूर्यदेवतेस स्थापन करावे.

विष्णू पंचायतन मंदिरामध्ये देवतांच्या मध्यस्थानी विष्णू त्यानंतर प्रदक्षिणाक्रमाने गणेश, सूर्य अम्बिका व शिवदेवतांची स्थापना करावी. शिवपंचायतन मंदिरामध्ये देवतांच्या मध्यभागी शिव त्यानंतर प्रदक्षिणाक्रमाने सूर्य, गणेश, चण्डी व विष्णूस्थापना करावी. चण्डी पंचायतन मंदिरात देवतांच्या मध्यभागी चण्डीदेवी व त्यानंतर प्रदक्षिणाक्रमाने शिव, गणेश, सूर्य आणि विष्णूस्थापना करावी. देवतांच्या मूर्ती स्थापन करताना परस्परदृष्टी वेध होणार नाही याची काळजी घ्यावीच लागते.
[email protected]
Mo. : 9821318552

आपली प्रतिक्रिया द्या