महाबळेश्वरात महातापमान, स्ट्रॉबेरीची पिके करपली

41

सामना ऑनलाईन,सातारा

गेल्या सात वर्षांत यंदा दुसऱयांदा महाबळेश्वरमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातले थंड हवेचे ठिकाण अक्षरशः पेटले असून स्ट्रॉबेरीची उभीच्या उभी पिके करपून गेली आहेत. गेल्या दोन वर्षांत येथील शेतकऱयांना कोटय़वधी रुपयांचा फटका बसला असून उत्पादनही कमी झाले आहे. तसेच तापमान वाढल्यामुळे पर्यटकांची संख्याही घटल्याचे ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

दोन वर्षांपासून महाबळेश्वरचे तापमान वाढत आहे. ज्या ठिकाणी पारा 30 ते 31 असायचा त्या ठिकाणी पारा 36 डिग्री सेल्सियसपर्यंत जात आहे. गेल्या वर्षीही महाबळेश्वरमध्ये 36.4 डिग्री सेल्सियस इतके तापमान होते. त्यामुळे येथील पाण्याची पातळीही खालावली असून पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी महाबळेश्वरमध्ये 20 ते 22 लाख पर्यटक येतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभरातून येथे पर्यटक येतात, परंतु प्रचंड तापमानामुळे गेल्या दोन वर्षांत ही संख्या घटली असून केवळ 15 ते 18 लाख पर्यटकच महाबळेश्वरमध्ये येत आहेत. शेतीला पाणीच मिळत नसल्यामुळे स्ट्रॉबेरीची उभी पिके जळून गेली. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक घेतले जाते. दरवर्षी 22 हजार टन इतके पीक घेतले जाते, परंतु गेल्या दोन वर्षांत उत्पादन कमी झाले असून केवळ 15 ते 18 हजार टन इतकेच उत्पादन होत आहे. पाणी नसल्यामुळे स्ट्रॉबेरीचा दर्जाही खालावला आहे.

या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

महाबळेश्वरमधील राजापुरी, तायगात, गौरोसी, कुमटे कोंडुशी, प्रतापगड, आचरी, कुळोशी, वानवती, बेळापूर अशा अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रचंड तापमानामुळे येथील पाणीपातळी खालावली असून शेतीला पाणीच मिळत नसल्यामुळे शेतकऱयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

स्ट्रॉबेरी महोत्सवालाही फटका

दरवर्षी या ठिकाणी एप्रिल महिन्यात स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही 14, 15 आणि 16 एप्रिल या तीन दिवशी स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु प्रचंड तापमानामुळे चांगल्या दर्जाची अशी स्ट्रॉबेरी पर्यटकांना दाखवायला मिळत नाही. तसेच पर्यटकांच्या मागणीनुसार पुरवठाही करता येत नसल्याची खंत येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.

हवामानात झपाटय़ाने बदल होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. वाढलेल्या तापमानामुळे येथील मुख्य पीक स्ट्रॉबेरीची पिके जळून जात असून उत्पादनातही घट झाली आहे. येणाऱया काळात तीव्रपाणीटंचाईचा सामना महाबळेश्वरकरांना करावा लागण्याची चिन्हे आहेत असं ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिल्लारे,

मुंबईकरांना चटके, घामाच्या धारा

मुंबईत गेल्या कही दिवसांपासून तापमानात चढउतार दिसत आहे. सोमवारी 38 अंशांवर असणारा पारा मंगळवारी दोन डिग्री सेल्सियसने खाली आला. असे असले तरीही उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. ईशान्येकडून येणाऱया उष्ण वाऱयांमुळे मुंबईत चटके जाणवत असल्याचे कुलाबा वेधशाळेचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही जास्त असल्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. परिणामी प्रचंड उकाडय़ाने मुंबईकर हैराण झाल्याचे चित्र असून राज्यातही पारा अजूनही 40 डिग्री सेल्सियसच्या वरच आहे. त्यामुळे कडक ऊन कायम आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या