अॅम्ब्युलन्सचा रस्ता अडवाल तर दहा हजार रुपयांचा दंड

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा आपातकालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास आता दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. केंद्र सरकार वाहतूक नियमांचे नवे विधेयक संसदेत सादर करणार असून या विधेयकात वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत.

वाहतूक नियमांचे सुधारित बिल येत्या काही दिवसांत संसदेत सादर करण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसार दारू पिऊन गाडी चालवल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर सिटबेल्टशिवाय गाडी चालवणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, वेगान गाडी चालवणे यांचे दंड पाचशे रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत आपातकालीन वाहनांना रस्ता न देणाऱ्या गाड्यांवर कारवाई होत नव्हती. मात्र आता अशा गुन्ह्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याच प्रयोजन करण्यात आले आहे.

तसेच नवीन नियमांनुसार जर अल्पवयीन मुलाने पालकांची गाडी वापरून एखादा गुन्हा केला तर त्यासाठी पालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच त्या गाडीची नोंदणी देखील रद्द करण्यात येईल. तसेच हिट अॅण्ड रन केसमध्ये तब्बल दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे देखील प्रयोजन केले आहे.