समस्या भाडेकरूंच्या, निराकरण म्हाडाचे: शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने रविवारी भाडेकरू मेळावा

471

मुंबईतील म्हाडांतर्गत पीएमजीपी योजनेतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, टेकूंवर तग धरून असलेल्याउपकर प्राप्त चाळी, मालकाची संमत्ती नाही, काही अडेलतट्टू भाडेकरूंमुळे अडकलेला पुनर्विकास, बिल्डर अर्धवट काम सोडून पळालाय, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न यांनी भेडसावलेल्या भाडेकरूंना दिलासा देणारा उपक्रम शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने आखण्यात आला आहे. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता चिंचपोकळी येथील जयहिंद सिनेमा समोरील नप्पू हॉल येथे या भाडेकरूंच्या भव्य मेळाव्याचे आयोजन शिवसेनेने केले आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे सभापती मधु चव्हाण हे म्हाडाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून भाडेकरूंना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत, शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर, म्हा़डा सदस्य व विधानसभा समन्वयक  बबन गांवकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, महीला उपविभाग संघटक यामिनी जाधव आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

भाडेकरू आणि रहिवाशांना पुनर्विकासाबाबत भेडसावणाऱ्या समस्या, तक्रारी आणि शंका लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या असून या मेळाव्याला चाळ कमिटी, भाडेकरू संघ, रहिवासी संघ, नियोजित गृहनिर्माण संस्था यांचे पदाधिकारी तसेच गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. भाखळा विधान सभा मतदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार रहात असून त्यामुळे भाडेकरूंबरोबरच गिरणी कामगारांना हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे.

मेळावा यशस्वी करण्यासाठी उपविभागप्रमुख राम सावंत, उपविभागप्रमुख विजय कामतेकर, विधानसभा संघटक विजय लिपारे, महीला संघटक सुरेखा राऊत, वंदना साळुंकेंसह शिवसैनिक, युवासेना, विद्यार्थी सेना, ग्राहक कक्षाचे पदाधिकारी झटत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या