अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळाने बुधवारी निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार रहिवाशांना 635 चौरस फुटांचे घर मिळणार असून 15 हजार रहिवाशांना या प्रकल्पाचा फायदा होईल.
अभ्युदय नगर वसाहतीत 1,33,593 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सद्यस्थितीत 48 इमारती असून 208 चौरस फूट आकारमानाच्या 3410 घरे आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या इमारतींच्या विकासाची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपविण्यात आली आहे. त्यानंतर मंडळातर्फे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास प्रक्रिया सी अॅण्ड डी प्रारूपानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा वेळापत्रकानुसार तांत्रिक बोली निविदा 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता उघडण्यात येणार आहे.
पार्किंग आणि वीस हजार रुपये भाडे
प्रत्येक रहिवाशाला चारचाकी वाहन पार्किंग असावी तसेच प्रत्येक रहिवाशाला पाच लाख रुपये कॉर्पस फंड एकदाच देण्याची अट निविदेत आहे. रहिवाशाला दरमहा वीस हजार रुपये भाडे विकासकाने देण्याचीही अटदेखील या निविदेत टाकली आहे.