प्रिशा शिंदे, समर्थ सहिता, अर्णव पापरकर उपांत्य फेरीत; दुहेरीत आकृती सोनकुसरे-ऐश्वर्या जाधव जोडीची आगेकूच

मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी. व महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदे यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत 18 व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे दुहेरीत आकृती सोनकुसरे-ऐश्वर्या जाधव या महाराष्ट्राच्या जोडीनेही आगेकूच केली.

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित समर्थ सहिताने गुजरातच्या दहाव्या मानांकित पंशुल उबोवेजाचा 6-1, 6-2 असा, तर अर्णव पापरकरने कर्नाटकच्या श्रीनिकेत कन्नन याचा 6-2, 6-1 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या दुसऱया मानांकित आराध्या क्षितिजने उत्तराखंडच्या नवव्या मानांकित अर्णव यादवचा  6-3, 3-6, 6-1 असा पराभव केला. मुलींच्या गटात कर्नाटकच्या बिगरमानांकित साई जान्वी टी. हिने दिल्लीच्या पाचव्या मानांकित याशिका शोकीनचा 6-2, 6-4 असा, तर महाराष्ट्राच्या बिगरमानांकित प्रिशा शिंदेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या राज्य सहकारी सहाव्या मानांकित ऐश्वर्या जाधवचा 7-5, 3-6, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.