टेनिस क्रिकेट: १२ एप्रिलपासून सुप्रिमो चषकाचा थरार

१० लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव

सांताक्रुझमधील एअर इंडिया ग्राऊंडवर रंगणार लढती

मुंबई

शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस व विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या पुढाकाराने २०१० सालामध्ये सुरू झालेली सुप्रिमो चषक ही हिंदुस्थानातील मानाची व नंबर वन टेनिस क्रिकेट स्पर्धा यंदा सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या स्पर्धेला आतापर्यंत दणदणीत प्रतिसाद लाभला आहे. टेनिस चेंडूने क्रिकेट खेळण्यावर अपार प्रेम करणारे क्रीडाप्रेमी व खेळाडू यांच्यासाठी ही स्पर्धा पर्वणीच ठरली आहे. यंदा १२ एप्रिलपासून सांताक्रुझमधील एअर इंडिया ग्राऊंडवर खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेत तब्बल १० लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत मालिकावीर ठरणाऱया खेळाडूला मारुती अल्टो कार आपल्या नावावर करता येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, सिने अभिनेता महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ यासारख्या दिग्ग्गज व्यक्तींकडून या स्पर्धेला मोलाचा सपोर्ट लाभला असून यंदाही नेते मंडळी, खेळाडू व सिने स्टार्सची उपस्थिती या स्पर्धेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

या वर्षी स्पर्धेत सहभागी होणारे संघ

अर्जुन संघटना (नागपूर), दहिसर बॉईज (दहीसर), एकता (गुजरात), शिरवणे सॅण्डी एसपी (दादर), मराठा पंजाब (भिवंडी), राजेंद्र स्पोर्टस् (सांताक्रुझ), सारा इंडिया (कोलकाता), शांतिरत्न इलेव्हन (पुणे), स्टार सीसी, दांडी (पालघर), तिरुपती सावर्डे (चिपळूण), ट्रायडंट, उमर इलेव्हन (नवी मुंबई), यू एस इलेव्हन (मुंबई), वैष्णवी, कोलाड (रायगड), विक्रोळीयन्स क्रिकेट क्लब (विक्रोळी), यश बिस्या लायन्स (छत्तीसगढ).

सुप्रिमो चषक ही टेनिस चेंडूने खेळवण्यात येणारी देशातील नंबर वन स्पर्धा असून या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत युवा खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन झळाळत्या करंडकासाठी जीवाचे रान करताना दिसतात. या स्पर्धेने आतापर्यंत आगळीवेगळी उंची गाठली असून अद्याप मोठा टप्पा गाठायचाय. कर्करोग व दुष्काळग्रस्तांना फाऊंडेशनद्वारे मदतीचा हात पुढे केला जात आहे. युवा खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे. म्हणूनच या वर्षी आयोजित केल्या जाणाऱया स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहोत.

दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत

संजय पोतनीस व अनिल परब यांनी सुप्रिमो चषकाच्या आयोजनातून गरीब व होतकरू खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याचसोबत त्यांनी सुप्रिमो फाऊंडेशनद्वारे सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. दुष्काळग्रस्त जनतेसाठी १० लाखांचा निधी त्यांच्याकडून देण्यात आला. कर्करोग व हृदयासंबंधी आजार असलेल्यांना वेळोवेळी मदत करण्यात येत आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेचा तसेच हॉस्पिटलचा खर्चही या फाऊंडेशनद्वारे देण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर हरहुन्नरी खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू बनवण्यातही पुढाकार घेण्यात येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याच्या १९ वर्षांखालील हिंदुस्थानी संघातील तसेच मुंबई रणजी संघातील खेळाडू पृथ्वी शॉ.

आपली प्रतिक्रिया द्या