रॉजर फेडरर टेनिसमधला स्वीस आल्प्स

52

<< निमित्त >>  << निमिष वा. पाटगावकर >>

टेनिसमधील देव फेडररला म्हणता येईल अशी लीला त्याने गेल्या रविवारी मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये करून दाखवली.

स्वित्झर्लंडला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते तिथल्या सौंदर्यातल्या अफाट विविधतेमुळे. स्वर्गात देव असतात तितके कदाचित संख्येने या पृथ्वीवरच्या स्वर्गात नसतील, पण एक देव मात्र नक्की इथे राहतो – रॉजर फेडरर. पुरुष एकेरी टेनिसमधील देव फेडररला म्हणता येईल अशी लीला त्याने गेल्या रविवारी मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये करून दाखवली. एकेरी खेळणारा टेनिसपटू पस्तिशीकडे झुकला की, त्याला साधारण देशाच्या डेव्हिस कप टीमचे न खेळणाऱ्या कर्णधाराचे पद खुणावत असते; पण या वयात ग्रँड स्लॅम जिंकून फेडररने इतिहास रचला. १९७२ ला केन रोझवॉलने ऑस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद ३७व्या वर्षी जिंकले होते. त्यानंतर ४५ वर्षांनी कुणीतरी वयाच्या पस्तिशीनंतर हा पराक्रम केला.

फेडररने २०१२ चे विम्बल्डन सातव्यांदा जिंकून सेंटर कोर्टचा सातबारा आपल्या नावावर करून घेतला खरा, पण त्यानंतर त्याच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला खीळ बसली. जोकोविच, मरे आणि त्याचाच देशबंधू वावरिंका ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपले नाव कोरत होते. २०१४ चा विम्बल्डन आणि २०१५ चे विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनचे तीन ग्रँड स्लॅम अंतिम सामने हरल्यावर फेडरर संपला अशी समजूत टेनिसप्रेमींची झाली होती. त्यातच त्याला गेल्या वर्षी दुखापतींनी ग्रासले. जानेवारीत झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली. २०१६च्या फ्रेंच ओपनमधून त्याने दुखापतीमुळे जेव्हा माघार घेतली तोपर्यंत त्याने १९९९ पासून सतत खेळत ६५ ग्रँड स्लॅम एकेरी स्पर्धा खेळायचा विक्रम त्याच्या नावावर केला होता. २०१६ चे शेवटचे सहा महिने तो स्पर्धात्मक टेनिसपासून दूरच होता.

गेली पाच वर्षे ग्रँड स्लॅम जिंकू न शकल्याने, दुखापतीतून नुकताच सावरलेला आणि वयाची पस्तिशी ओलांडलेला फेडरर त्याच्या पुनरागमनात ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवेल हे भाकीत टेनिसमधले तज्ञच काय सर्वसामान्य टेनिसप्रेमी ही करायला धजावला नसता. या सर्व विरोधात जाणाऱ्या गोष्टींवर मात करून फेडररने हे विजेतेपद मिळवले म्हणूनच त्याला स्वत:लासुद्धा १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदात हे सर्वात जवळचे वाटते.

सतत खेळणाऱ्या कुठच्याही महान खेळाडूला अचानक विश्रांती घ्यावी लागली की, तो वेगात चाललेल्या गाडीला ब्रेक लागल्यासारखा वाटतो. सचिन तेंडुलकरला तो टेनिस एल्बोच्या दुखापतीने लागला होता. तेंडुलकर काय किंवा फेडरर काय, महान खेळाडूंचे हेच विशेष असते की, आपल्या कारकीर्दीचा वेग कमी जास्त करत अव्वल स्थानी राहायचे याचे त्यांना उत्तम ज्ञान असते. वीस वर्षांच्या कारकीर्दीत फक्त सहा महिन्यांची सुट्टी हे प्रमाण योग्य आहे हे त्याने त्याच्या मनात घोटवले आणि या विश्रांतीकडे सकारात्मकतेने पाहिले.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतला फेडररचा प्रवास खडतर होता. निशिकोरीने आणि उपांत्य सामन्यात वावरिंकाने त्याला चांगलेच झुंजवले. कदाचित दुखापती आणि विश्रांतीनंतर मैदानात उतरणाऱ्या फेडररला आपला स्टॅमिना तपासायला आणि वाढवायला हे दोन सामने उपयोगी पडले असावेत. अंतिम सामन्यात त्याला नदालबरोबर तुल्यबळ लढतीत पाच सेट खेळताना याचा नक्कीच उपयोग झाला.

अंतिम सामन्यात फेडररच्या काही नाहक चुका त्याला महागात पडल्या असत्या. विशेषत: शेवटच्या सेटमध्ये नदालने फेडररची सर्व्हिस तोडली म्हणण्यापेक्षा फेडररच्या काही चुकांनी तो गेम नदालला भेट मिळाला. फेडररला पुन्हा अंतिम सामना हरायचा नव्हता. त्यामुळेच त्याने त्याचा खेळ उंचावत पुढचे पाच गेम जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. नदालच्या सर्व्हिस गेममध्ये झालेली २६ शॉटस्ची रॅली फेडररने जिंकताना आपली सर्व ब्रह्मास्त्र बाहेर काढली. ही रॅली म्हणजे या दोन महान खेळाडूंनी त्यांच्या कौशल्याचा पेश केलेला नजराणा होता.

फेडररच्या विजयाच्या प्रतिक्रिया या सौम्य असतात. स्वीस आल्प्सप्रमाणे तो महान असला तरी त्या आल्प्सप्रमाणेच कायम शीतल असतो. फेडररने सामना तर जिंकलाच, पण विजेतेपदाच्या भाषणाने त्याने मनेही जिंकली. दोन खेळाडूंत स्पर्धा ही फक्त सामना चालू असेपर्यंतच असावी आणि प्रतिस्पर्ध्याचा मान कसा राखावा हे त्याने आपल्या भाषणातून दाखवले. यातून त्याच्या कर्तृत्वाच्या थोरवीबरोबरच मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

नदाल आणि फेडरर या लढतीची सर्व टेनिस जगात आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या अटीतटीची अपेक्षा होती तसंच हा अंतिम सामना झाला. दोघांच्या वयाचा विचार केला तर नदाल जिंकला असता तर कदाचित फेडररने पुन्हा भरारी घेतलीच नसती. त्यामुळे फेडररचे जिंकणे हे त्याच्या स्विस चाकूसारख्या धारदार फटक्यांनी भरलेले असले तरी स्वीस चॉकलेटसारखेच गोड वाटले. फ्रेंच ओपन चालू होईपर्यंत या मेजवानीची चर्चा टेनिसविश्वात चालू राहील.

 

आपली प्रतिक्रिया द्या