सिंघू बॉर्डरवर अमानुष हत्याकांड, देश हादरला; एक हात तोडलेला मृतदेह शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी टांगला!

शेतकरी आंदोलनाचे ठिकाण असलेल्या सिंघू बॉर्डरवरील अमानुष हत्याकांडाने एकच खळबळ उडाली असून देश हादरला आहे. हत्या करण्यात आलेल्या युवकाला 100 मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले, एक हात कापला गेला आणि मृतदेह संयुक्त किसान आंदोलनाच्या व्यासपीठासमोर बॅरिकेड्सला लटकवण्यात आला. हे हत्याकांड म्हणजे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचेही म्हटले जात आहे. या युवकावर गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केल्याचा आरोप आहे.

दिल्लीच्या बाहेर सिंघू सीमेवर पुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. तेथे शुक्रवारी पहाटे 5 वाजता बॅरिकेड्सला बांधलेला मृतदेह आढळला. या मृतदेहाचा एक हात कापला आहे. पाचही बोटांसह संपूर्ण तळवा कापून वेगळा करण्यात आला आहे. मानेवर धारदार शस्त्र्ााने हल्ला केल्याच्या खुणाही आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुंडली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला आणि शवविच्छेदनासाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या हत्येमागे निहंग असल्याचा आरोप केलाय. निहंगा सुरुवातीपासून आम्हाला अडचणीत आणत आहेत. या घटनेशी किसान मोर्चाचा काही संबंध नाही. या हत्याकांडातील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरयाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी असल्याचे राजेवाला यांनी म्हटले आहे.

कोणीतरी 30 हजार देऊन पाठवले

निहंगांचा आरोप आहे की, या तरुणाला एका षड्यंत्राखाली येथे पाठवण्यात आले होते. यासाठी त्याला 30 हजार रुपये देण्यात आले. या तरुणाने येथील पवित्र गुरु ग्रंथ साहिबच्या काही भागाची विटंबना केली. निहंगांना जेव्हा हे कळले तेव्हा त्याला पकडले.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

या अमानुष हत्याकांडासंदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक हंसराज सोनीपत यांनी दिली.

घटनेच्या 15 तासांनंतर निहंगची शरणागती

सिंघू बॉर्डरवर तरुणाची हत्या होऊन 15 तास उलटल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी निहंग शिखांपैकी एक सरबजीत सिंगने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. संबंधित तरुणाने श्री गुरू ग्रंथ साहिबचा अपमान केला. त्यामुळेच संतप्त होत निहंग शिखांनी त्या तरुणाची हत्या केल्याचे सरबजीतने कबूल केले. त्यानंतर पुंडली पोलीस ठाण्याच्या पथकाने सरबजीतला ताब्यात घेऊन अटक केली. अटकेपूर्वी त्याने पोलिसांच्या पथकासोबतच श्री गुरू ग्रंथ साहिबचे दर्शन घेतले. सरबजीतला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. श्री गुरू ग्रंथ साहिबचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही सरबजीतने दिला आहे.

संयुक्त किसान मोर्चाकडून निवेदन जारी

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या या हत्येप्रकरणी संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही पद्धतीने आणि शांततामय मार्गाने सुरू असलेले शेतकरी आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोध करते असे निवेदनात म्हटले आहे.

या घटनेतील निहंग समूह किंवा मृत व्यक्ती दोघांसोबत संयुक्त किसान मोर्चाचा कोणताही संबंध नाही. आम्ही कोणत्याही धार्मिक ग्रंथ किंवा प्रतिकाच्या अपमानाविरोधात आहोत. मात्र त्या आधारे कोणत्याही व्यक्ती अथवा समूहाला कायदा हातात घेण्याची परवानगी मिळत नाही. या हत्या आणि धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेची चौकशी करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा द्यावी.

हत्येचे कारण काय?

  • प्राथमिक माहितीनुसार शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’शी छेडछाड केल्याचा आरोप हत्या झालेल्या युवकावर करण्यात येत आहे.
  • शीख योद्धा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘निहंग शीख’ समूहातील लोकांनी ही हत्या केल्याची चर्चा आहे.
  • मात्र या हत्येमागील निश्चित कारण अद्यापही समोर आलेले नाही. पोलिसांनीदेखील याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे.