पूजा सकटच्या हत्येने भीमा कोरेगाव येथे तणाव

51
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । पुणे

भीमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदार तरुणीचा विहिरीमध्ये मृतदेह सापडल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये पोलिसांनी नऊजणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करीत, त्यातील दोघांना अटक केली आहे. दरम्यान, आम्ही राहत असलेल्या जागेबाबत तेथील काहीजणांसोबत वाद सुरू होता. त्या वादातून पूजा सकटची हत्या झाल्याचा आरोप तिचे वडील सुरेश सकट यांनी केला आहे.

पूजाचे काका दिलीप नानासाहेब सकट (रा. केडगाव, जि. नगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. भीमा कोरेगाव येथील कल्याणी फाटा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा आहे. तेथे रस्त्याच्या कडेला सकट परिवार राहत होता. सकट यांची त्यांच्या शेजाऱ्यांना अडचण होत होती. त्यामुळे त्यांनी ही जागा सोडावी, यासाठी ते वारंवार भांडण करीत होते. यामुळे १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकट यांनी पोलिसांकडे तक्रार करून संरक्षणाची मागणी केली होती; परंतु संरक्षण मिळाले नाही. त्यानंतर एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दंगल उसळली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी २ जानेवारीला गावात संचारबंदी असतानाही काही समाजकंटकांनी आमचे घर जाणीवपूर्वक जाळले. माझा मुलगा जयदीप आणि मुलगी पूजा हे दोघे या घटनेचे साक्षीदार होते. त्यामुळेच तीला संपवून टाकण्यासाठी हा प्रकार झाल्याचा आरोप सकट यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, सकट यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये जाळपोळीच्या घटनेनंतर जयदीप आणि पूजाला अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. यासंदर्भात शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी पुन्हा धमकी आली होती. २० एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील रातंजन येथे गावची जत्रा असल्याने सुरेश सकट आणि जयदीप सकट हे गावी आले होते. त्यानंतर २१ एप्रिल रोजी पूजा घरात नव्हती. तिचा शोध घेतला; परंतु ती सापडली नव्हती. दुसऱ्या दिवशी घराजवळ असलेल्या शेतातील विहिरीमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृत्यूला नऊजण कारणीभूत असल्याने त्यांच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात आज तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एका महिन्यात पुनर्वसन
सकट कुटुंबीयांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन व्हावे, यासाठी पूजा प्रयत्न करत होती. तिचा मृतदेह ताब्यात घेतला जात नसल्याने या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक सुवेझ हक, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी चर्चा केली. तसेच, सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात सकट परिवाराचे म्हणणे ऐकून घेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी एका महिन्यात कुटुंबीयांचे पुनर्वसन करू, आरोपींवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.

भीमा कोरेगावमध्ये कडक बंदोबस्त
या घटनेमुळे भीमा कोरेगावमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून बारामती विभागाचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पाखले, उपअधीक्षक संदीप बांगर, गणेश मोरे, बरकत मुजावर यांच्यासह १०० पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने गावाला छावणीचे रूप आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या