धरणे अर्ध्यापेक्षा अधिक रिकामी, पाणीकपातीचे संकट

629

कृष्णा खोऱयातील धरणांच्या पाणलोटात ऐन मोसमातील पावसाचे दिवस कोरडे गेल्याने धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 33 ते 35 टक्क्यांपर्यंतच अडखळला आहे. नारळी पौर्णिमेनंतर नैऋत्य मोसमी पावसाचा जोर ओसरतो. त्यामुळे यंदा धरणे अर्धी भरतील की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यंदा खडकवासला प्रकल्प आणि पवना धरणामध्ये 1 ऑगस्टला नीचांकी पाणीसाठा असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरापुढे पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून 9.82 टीएमसी म्हणजेच 33.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आज रोजी हा पाणीसाठा 25.86 टीएमसी म्हणजेच 88.72 टक्के होता. पावसाळासुरू झाला तेव्हा या चारही धरणांत मिळून 23 टक्के पाणीसाठा होता; म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये फक्त 10 ते 12 टक्के पाणीसाठा वाढला आहे. सर्वसाधारणपणे 7 जुलै ते 31 जुलैदरम्यान सर्वाधिक पाऊस या धरणांच्या पाणलोटात होतो. यंदा हे सर्व दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

खडकवासलाची स्थिती बिकट

खडकवासला प्रकल्पामधील धरणांतील पाणीसाठय़ाची स्थिती आज रोजी खूपच बिकट आहे. पानशेत धरण 40 टक्के भरले असून, वरसगावमध्ये 32.58 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला 30 टक्क्यांवर असून, टेमघरमध्ये अवघे 20 टक्के पाणी आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱया पवना धरणाची स्थिती बिकट असून, या धरणात अवघा 32 टक्के पाणीसाठा आहे.

कृष्णा खोऱयातील सर्व धरणे 75 टक्क्यांच्या आतच

कृष्णा खोऱयातील एकही धरण 75 टक्क्यांपर्यंत भरलेले नाही. प्रमुख धरणांतील आजची स्थिती उपयुक्त पाणीसाठय़ाची टक्केवारी याप्रमाणे- कोयना 47, चासकमान 17, डिंभे 37, मुळशी 28, भाटघर 40, वीर 40, वारणा 58, दूधगंगा 64, राधानगरी 59, उरमोडी 65, कन्हेर 45.

उजनीत दोन महिन्यांत 13 टक्के पाणी वाढले

एकीकडे पश्चिम मावळ भागातील धरणे कोरडी असताना दुसरीकडे नेहमी उणे असणाऱया उजनी धरणात मात्र 11 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये या धरणात 12 ते 13 टक्के पाणी वाढले आहे. भीमा नदीच्या पूर्वेकडील खुल्या पाणलोटात यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा उजनी धरणाला झाला आहे; तसेच सोलापूर जिह्यात चांगला पाऊस असल्याने उजनीमधून पाण्याची मागणीदेखील कमी झाल्याचा हा परिणाम आहे, असे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या