लढायला जिगर लागते!

61

लढवय्यांची जमात जिवंत आहे म्हणून कश्मीरपासून डोकलामपर्यंत देशाच्या दुश्मनांना मागे रेटले जात आहे. दुश्मनांशी लढण्यासाठी जिगर लागते. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हिंदुस्थानच्या केसालाही धक्का लागणार नाही. हिंदुस्थानातील कोण लोक किती इन्कम टॅक्स भरतात यावर देशाचे दुश्मन सीमेवरून परत जात नाहीत. त्यांना मनगटाच्या जोरावर उखडून फेकावे लागते प्रसंगी हौतात्म्य पत्करावे लागते. हुतात्मा रवींद्र धनावडे यांनी ती जिगर दाखवली. त्यांचा पगार इन्कम टॅक्सचा आकडा नगण्य असेल, पण त्यांचे शौर्य राष्ट्रभक्तीची तुलना कोणत्याच संपत्तीशी करता येणार नाही. धनावडे यांच्या शौर्यास आमची मानवंदना!

देशभरातील हिंसेच्या बातम्यांनी पंतप्रधान मोदी यांना अस्वस्थ केले आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी मन मोकळे केले आहे. श्रद्धेच्या नावावर हिंसा खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हरयाणातील एका ‘बाबा’च्या खटल्यानंतर  भडकलेल्या हिंसाचारावर पंतप्रधानांनी आपले मत व्यक्त केले असले तरी ‘‘राजकीय स्वार्थासाठी ‘पंचकुला’ जळू दिले’’ असा ठपका न्यायालयाने हरयाणा सरकारवर ठेवला आहे. मनःशांती बिघडवणाऱ्या घटना देशात रोज घडत आहेत. हरयाणातील कोसळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा ठपका न्यायालयाने भाजप सरकारवर ठेवला हे धक्कादायक आहे. हे सर्व घडत असताना कश्मीर खोऱ्यातील हिंसाचार थांबलेला नाही. पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत घुसून अतिरेक्यांनी हल्ला केला असून आठ जवान शहीद झाले आहेत. त्या बदल्यात तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले असले तरी आपले आठ तर त्यांचे तीन मारले जात आहेत हे प्रमाण योग्य नाही. पोलिसांच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवण्याच्या उद्देशानेच हा अतिरेकी हल्ला केला गेला. त्यांचा हा उद्देश सफल झाला नाही हे खरे असले तरी कश्मीरमधील हिंसाचार कमी झाला आहे, या केंद्र सरकारच्या दाव्यावर

प्रश्नचिन्ह निर्माण करणारा

हा हल्ला आहे. कश्मीरमध्ये गेल्या वर्षीही याप्रकारचे अतिरेकी हल्ले झाले. चार-पाच दिवसांपूर्वी हंदवाडाच्या जंगलात अतिरेकी आणि हिंदुस्थानी लष्करात जोरदार चकमक झाली होती. फेब्रुवारी महिन्यातही कुलगाम जिल्हय़ातील यारीपोडा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. अर्थात यावेळी तीन हिंदुस्थानी जवानांनाही वीरमरण आले होते. अमरनाथ यात्रेकरूंवरील अतिरेकी हल्ल्याच्या जखमा अद्यापि ताज्याच आहेत. त्यात आता हा नवा हल्ला अतिरेक्यांनी केला. त्याला पाकडय़ा लष्करानेही आरएसपुरा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अप्रत्यक्ष ‘कव्हर’ देण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावरून गुद्दे देण्याचे इशारे दिले होते. या इशाऱ्यांचे नगारे पाकडय़ांनी सुंदरबनी परिसरातील देवरा गावावर डरवली तोफांचा मारा करून फोडले असेच म्हणावे लागेल. पाकिस्तानचे हिंदुस्थानबाबतचे ‘नापाक’ इरादे कायम आहेत हेच पुलावामातील पोलीस वसाहतीवरील हल्ल्याने दाखवून दिले आहे. या हल्ल्यात जे आठ जवान शहीद झाले त्यात साताऱ्याचे वीरपुत्र रवींद्र धनावडे यांचा समावेश आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्र व मराठी माणूस सतत बलिदान देतच आला आहे.

महाराष्ट्राच्या नसानसांत

मर्दानगीचे रक्त उसळत आहे व देशासाठी छातीवर गोळ्या झेलण्यास आमची मराठी पोरं सदैव सज्ज असतात हे महाराष्ट्राला फालतू शहाणपण शिकविणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ‘‘आम्ही सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरतो, आम्ही सर्वात जास्त पैसे कमावतो, आमच्या वाटय़ाला जाऊ नका’’ अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, रवींद्र धनावडेसारखे शूरवीर या मातीत सतत जन्म घेत आहेत म्हणून हा देश टिकून आहे व पैसे कमवणारे फक्त पैसेच कमवत आहेत. देश नसेल तर तो पैसा आणि इन्कम टॅक्स काय चाटायचा आहे? लढवय्यांची जमात जिवंत आहे म्हणून कश्मीरपासून डोकलामपर्यंत देशाच्या दुश्मनांना मागे रेटले जात आहे. दुश्मनांशी लढण्यासाठी जिगर लागते. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हिंदुस्थानच्या केसालाही धक्का लागणार नाही. हिंदुस्थानातील कोण लोक किती इन्कम टॅक्स भरतात यावर देशाचे दुश्मन सीमेवरून परत जात नाहीत. त्यांना मनगटाच्या जोरावर उखडून फेकावे लागते व प्रसंगी हौतात्म्य पत्करावे लागते. हुतात्मा रवींद्र धनावडे यांनी ती जिगर दाखवली. त्यांचा पगार व इन्कम टॅक्सचा आकडा नगण्य असेल, पण त्यांचे शौर्य व राष्ट्रभक्तीची तुलना कोणत्याच संपत्तीशी करता येणार नाही. धनावडे यांच्या शौर्यास आमची मानवंदना!

आपली प्रतिक्रिया द्या