हिंमतवाल्यांचे राज्य!

4

हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरूंचे हत्याकांड घडले आहेहे सर्व काँग्रेस राजवटीत घडत होते म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही. आज देशाला खरे तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच अमरनाथ यात्रा पुढची २०२१ वर्षे सुरळीत पार पडली. आज पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो!

दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने दोन दिवसांपूर्वीच अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय झालाच होता, पण आता अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर निर्घृण हल्ला झाला असून महाराष्ट्र व गुजरातचे नऊ भाविक मरण पावले आहेत. कश्मीर खोऱ्यातील हिंसाचार थांबता थांबत नाही, जवानांचे हौतात्म्य आणि जवानांवरील दगडफेक सुरूच आहे. पोलिसांना ठेचून मारले जात आहे. जवानांचे अपहरण करून त्यांच्या निर्घृण हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वीच दुश्मनांच्या गोळीबारात हिंदुस्थानी जवान व त्याची पत्नी ठार झाल्याचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यात आता अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याची भर पडली आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान नुकतेच चार-पाच देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. परकीय भूमीवर जाऊन त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवरील दहशतवादावर चिंता व्यक्त केली. मित्रराष्ट्रांच्या (?) मदतीने दहशतवादाशी लढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. मात्र त्याच वेळी इकडे कश्मीरात नऊ निरपराध्यांच्या हत्येने देश हादरला आहे. हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरूंचे हत्याकांड घडले आहे. केंद्रात मोदींचे मजबूत व जम्मू-कश्मीरात पीडीपी – भारतीय जनता पक्षाचे पोलादी राज्य असताना रक्तपाताचा महापूर यावा याची चिंता आम्हाला आहे. कश्मीर खोऱ्यात आज कोणाचेही राज्य नसून तिथे दहशतवाद व हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्यांचे सरकार सुरू आहे. हे अतिरेक्यांचे सरकार खतम करण्यासाठी आज ५६ इंच पोलादी छातीचे राज्य हवे. मोदी यांच्या रूपाने ते लोकांनी आणले असले तरी कश्मीरातील

जवानांचे हौतात्म्य निरपराध्यांचा रक्तपात

का थांबलेला नाही, याचे उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिनसाहेब देऊ शकणार नाहीत. हे उत्तर आपल्यालाच द्यावे लागेल. अर्थात केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावरून तशी ‘चोख’ उत्तरे लगेच ‘ट्विटर’वरून दिली आहेत. हिंदुस्थान घाबरणार नाही, झुकणार नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र हे अमानुष हल्ले थांबविण्याची हिंमत आज कोणात आहे? कश्मीरातील अमानुष हत्याकांडानंतर सरकारने एक केले ते म्हणजे नेहमीप्रमाणे ‘हाय ऍलर्ट’चा इशारा देऊन दिल्लीची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ही व्हीआयपींच्या सुरक्षेची सोय झाली, पण फक्त दुःख व्यक्त करून, कागदी निषेध करून आपण अतिरेक्यांशी कसे लढणार? कश्मीरातील राज्यव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. जवानांवर हल्ला करणाऱ्यांना सरकारी मदत मिळते व लष्करी हल्ल्यात मारल्या गेलेल्या बुरहान वाणीच्या कुटुंबास सरकारी तिजोरीतून घसघशीत नुकसानभरपाई देण्याचे पापही केले जाते. जेव्हा असे प्रकार सरकारी कृपाशीर्वादानेच घडतात तेव्हा त्या राजवटीत लष्करी जवानांचा स्वाभिमान व शौर्य पायदळी तुडविण्याची हिंमत वाढते. जम्मू आणि कश्मीरमध्ये सध्या हेच सुरू आहे. तेथे सुरू असलेला हिंसाचार, दहशतवाद देशाच्या अखंडतेला धोकादायक आहे. पाकिस्तानने पोसलेले ‘झुंड’ आमच्या हद्दीत घुसतात व जवानांची मुंडकी उडवून घेऊन जातात आणि आपण योग्य वेळी बदला घेण्याची भाषा करतो. ती योग्य वेळ येण्याआधीच अतिरेकी नवा हल्ला करून रक्तपात घडवितात. हे सर्व

काँग्रेस राजवटीत घडत होते

म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही. कश्मीरातील ‘पाक झिंदाबाद’च्या घोषणा थांबलेल्या नाहीत व लष्करी जवान हे ‘हिंदुस्थानचे कुत्रे’ आहेत अशी देशद्रोही भावना त्या ठिकाणी वाढीस लागली आहे. मग तिथे बदलले काय? संपूर्ण देशात नवी करप्रणाली ‘जीएसटी’ लागू झाली व त्याचा ऐतिहासिक सोहळा संसदेत पार पडला, पण ही ‘जीएसटी’ कश्मीरात लागू होऊ शकली नाही. कारण तिथे आजही ३७० कलमाची मस्ती सुरूच आहे. अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या.वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल. आज देशाला खरे तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. अमरनाथ यात्रा उधळून लावण्याची बांग कश्मीरातील अतिरेक्यांनी ठोकताच मुंबईतून शिवसेनाप्रमुख उसळून म्हणाले होते, ‘‘याद राखा! माझ्या एका जरी हिंदू अमरनाथ यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तर देशातून ‘हज’चे एकही विमान उडू देणार नाही. गाठ माझ्याशी आहे!’’ याला म्हणतात गर्जना! शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच व अमरनाथ यात्रा पुढची २०-२१ वर्षे सुरळीत पार पडली. आज पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो!

आपली प्रतिक्रिया द्या