जम्मू-कश्मीर – मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरचा पुतण्या ‘फौजी भाई’चा खात्मा, लष्कराला मोठे यश

1111

जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा जवानांना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याच्या पुतण्यासह तीन कुख्यात दहशवाद्यांचा बुधवारी खात्मा केला. जवानांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे.

बुधवारी झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी फौजी भाई उर्फ फौजी बाबा उर्फ इस्माईल हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर याचा पुतण्या होता. फौजी भाई आयईडी बॉम्ब बनवण्यात निष्णात होता. 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आयईडी बॉम्ब इस्माईल याने बनवला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.

गेल्या महिन्यात पुन्हा एकदा पुलवामामध्ये आयईडी ब्लास्ट करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता. मात्र गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जवानांनी हा कट उधळून लावला होता. यावेळी आयईडीने भरलेली कार ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आली होती. या हल्ल्याच्या नियोजनामागे इस्माईलचा हात होता. बुधवारी त्याचा खात्मा करण्यात आला.

बुधवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील कंगन भागात सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेतले. यावेळी उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी ठार करण्यात आलेल्या भागातून मोठा शस्रसाठा जप्त करण्यात आला. याआधी मंगळवारीही दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या