पाकिस्तानी दहशतवाद्यांचा रेल्वे रुळांवर डोळा गर्दुल्ले, भिकारी, विक्रेत्यांच्या वेशात हल्ल्याचा धोका…

38

सामना ऑनलाईन,मुंबई

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हिंदुस्थानातील रेल्वे रुळांवर डोळा असून ते गर्दुल्ले, भिकारी आणि विक्रेत्यांच्या वेशात घातपात घडवू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर पोलीस महासंचालकांनी रेल्वे प्रशासनाला अॅलर्ट केले असून रेल्वे स्थानक आणि रुळांवरील कर्मचायाची गस्त आणि पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या ऍलर्टमुळे रेल्वे प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या इशाऱ्याचा हवाला देत कर्मचाऱयांनी ‘जागते रहो’ असे बजावले आहे.

 • रेल्वे अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना
 • स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, गुप्तचर यंत्रणा यांच्या संपर्कात राहा
 • गर्दुल्ले, भिकारी, बेकायदा विक्रेते, रुळांच्या कडेला असलेल्या उनाड आणि खोडकर मुलांवर विशेष लक्ष ठेवा.
 • त्यांना हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्या
 • रेल्वे रुळांचे तुकडे तसेच इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा
 • रेल्वे रुळांची तपासणी अधिक कडक करा.

यूपी, बिहारमध्ये जाणाऱ्या गर्दीच्या गाड्या टार्गेट

रेल्वे रूळ उडवून अपघात घडविण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. मुंबईतून परराज्यात जाण्याऱ्या लांब पल्ल्याच्या आणि विशेषकरून गर्दीच्या गाडय़ा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. उत्तर प्रदेश, बिहार तसेच दक्षिणेकडील जाणाऱ्या काही गाडय़ांमध्ये नेहमीच गर्दी असते. या गाडय़ांवर लक्ष ठेवा असे ऍलर्टमध्ये बजावण्यात आले आहे.

 • काय आहे अॅलर्टमध्ये
 • पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर रेल्वे रूळ
 • बोगस पासपोर्टवर अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्थानात घुसण्याची शक्यता
 • मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरातील एखादे कॉलेज किंवा विद्यापीठ परिसरात आश्रय घेऊ शकतात
 • रेल्वे प्रवासी, कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये याबाबत जनजागृती करा.
आपली प्रतिक्रिया द्या