देशातील विमानतळांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी (२६ जानेवारी) देशातील महत्वांच्या विमानतळांवर हल्ले करण्याचा कट इसिस, लश्कर ए तोयबा, अल कायदा या  दहशतवाद्यांनी आखल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. यासाठी दहशतवादी प्राणी, ड्रोन विमान, एअर अँम्ब्युलन्स,चार्टर्ड विमानाचा माध्यम म्हणून वापर करु शकतात असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.

तसेच अत्तराच्या बाटल्या किंवा कम्प्युटर स्कॅनरच्या आत विस्फोटक लपवून दहशतवादी त्यांचा स्फोट घडवू शकतात, असा इशाराही गुप्तचर विभागाने दिला आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशातील महत्वाच्या विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे  विमानतळांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच राजपथावरही निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.