देशविदेश..चिकन लज्जतदार

शेफ मिलिंद सोवणी

चिकन स्वस्त, मस्त आणि चवीलाही छान! चिकन म्हणूनच लोकांना मटन आणि फिशपेक्षा जास्त आवडतं. ते सहज उपलब्ध होतं. त्याचं फार्मिंग होत असतं. फार्मिंग होत असल्याने ते बाजारात स्वस्त मिळू शकते. ते स्टोअरही करता येतं. असे चिकनचे बरेच फायदे असल्यामुळे हिंदुस्थानाततो नंबर वन नॉनव्हेज पदार्थ आहे यात वाद नाही. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर रेड मीटपेक्षा व्हाईट मीट कधीही चांगलं समजलं जातं. कारण रेड मीटमध्ये कॉलेस्टेरॉलमुळे हृदयाला धोकाही असतो.

चिकन म्हटलं म्हणजे मालवणी करी किंवा चिकन बिर्याणी हे नेहमीचे प्रकार झालेत. चिकनचं मांस कोणत्याही पदार्थामध्ये चांगल्या प्रकारे मिसळून जातं. चिकनपासून बरेच पदार्थ बनवता येतात. म्हणून पहिली डिश मी दिलीय ती कबाबबन्नो’… हा पदार्थ हेल्दी असल्यामुळे मी येथे तो दिलाय. तोतंदूरमध्ये शिजवावा लागतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले, तेल, तूप वगैरे घातलं जात नाही. म्हणून एका अर्थाने तंदुरी कुकिंग चांगलं म्हटलं पाहिजे. यात दही घातलंय. ते हेल्दी असतं आणि हा पदार्थ पचायलाही हलका आहे. चिकन चांगलं शिजायचं असेल तर त्याचं मॅरिनेशन खूप महत्त्वाचंआहे. चिकनला कमीत कमी सहासात तासांचं मॅरिनेशन असलंच पाहिजे. फिशला असं नसतं. ते लगेच केलं तरी चालू शकतं. दुसरा पदार्थ दिलाय तो चायनीज स्टाईलचं चिकन.. या पदार्थाची खासीयत अशी की, तो गॅसच्या मोठय़ा आंचेवर बनवलेला आहे. कोणताही चायनीज पदार्थ हाय फ्लेमवरचबनवतात. ते हाय प्रेशर कुकिंग असतं. हे चिकनसाठी चांगलं मानलं जातं. कारण त्यामुळे बाहेरून चिकन चांगलं शिजतं आणि आतून त्याचा ज्यूसनेस तसाच राहतो. हे मटनाच्या बाबतीत होऊ शकत नाही. चिकनचे तुकडे छोटे छोटे केलेले असतात. हाय फ्लेमवर शिजवल्याने ते बाहेरून शिजलेलेलागते आणि आतून ज्युसी लागतं.

कबाबबन्नो

साहित्य बोनलेस चिकन ५००  ग्रॅम, बेसन १०० ग्रॅम, तेल दीडशे मि.ली., कापलेल्या हिरव्या मिरच्या ३ ते ४, इंचभर आल्याचा तुकडा, आलेलसणाची पेस्ट १ चमचा, मीठ चवीनुसार, पिवळी मिरची पावडर २ चमचे, पिवळा रंग चिमूटभर, ३ अंडय़ांचा पिवळा बलक, अर्धा चमचा गरम मसालाआणि कापलेली कोथिंबीर अर्धा कप.

कृती सर्वप्रथम चिकन टिक्काच्या आकारात बोनलेस चिकनचे तुकडे करून घ्यायचे. त्यात आलेलसणाची पेस्ट आणि मीठ घालून किमान अर्धा तास ठेवून द्यायचे. दरम्यान कढईत तेल गरम करून त्यात बेसनचे पीठ घालायचे आणि बेसन त्याची मूळ चव जाईपर्यंत शिजू द्यावे. मग त्यात बाजूलाठेवलेले चिकन, मिरच्या, आले आणि मसाला पावडर टाकून चिकन अर्ध्या तासापर्यंत शिजवायचे. शिजल्यावर ते उतरवून ठेवावे. त्यात अंडय़ाचा पिवळा बलक, मीठ आणि कापलेली कोथिंबीर टाकायची. चिकनचे तुकडे एका ओळीने घेऊन ओव्हनवर २३० डिग्रीवर शिजू द्यायचे. ते पूर्णपणे शिजले की,त्यात अंडय़ाचा राहिलेला भाग मिसळायचा. अंडय़ाचा त्यावर लेप लागेपर्यंत हे मिश्रण पुन्हा तंदूरमध्ये शिजू द्यायचे. त्यानंतर वाढावे.

चायनिज हनी चिकन

साहित्य कापलेले चिकन दीड कप, कापलेला कोबी पाव कप, कापलेला गाजर पाव कप, कापलेला कांदा पाव कप, कापलेल्या मिरच्या पाव कप, मध सवा चमचा, सोया सॉस अर्धा चमचा, चवीपुरते मीठ, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, फ्राईड नुडल्स २०० ग्रॅम, तेल  अर्धा कप.

कृती प्रथम छिद्रे असलेल्या छोटय़ा भांडय़ात नुडल्स घेऊन ते भांडे गरम तेलात बुडवायचे. नुडल्स गुलाबी झाले की बाहेर काढायचे. या नुडल्सना कपाचा आकार तयार होतो. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, कोबी, मिरच्या, गाजर यांचे तुकडे घालायचे. मग त्यात कापलेलेचिकन मिसळून तळून घ्यायचे. ते चांगले शिजले की मग त्यात सॉस, मध, मीठ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. आता नुडल्स तळून घ्यायचे. त्यानंतर चिकन या फ्राईड नुडल्सने बनलेल्या कपात वाढावे. हा पदार्थ गरमागरम तव्यावरून काढलेल्या वेगवेगळ्या तळलेल्या भाज्यांबरोबर छानलागतो. त्यावर कापलेला कांदाही घालता येईल.