टीईटी प्रमाणपत्र तपासणीसाठी त्रयस्थ समिती नेमा ,मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी

नेमणुका मिळालेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी पारदर्शक व विश्वासार्ह व्हायची असेल तर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱयांमार्फत तपासणी न करता त्यासाठी तटस्थ समिती नेमा, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली आहे. गेल्या 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील सर्व प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक टीईटी पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले आहेत. टीईटी परीक्षेत अपात्र उमेदवारांकडून दलालांमार्फत पैसे घेऊन परीक्षार्थींचे गुण वाढवण्याचा प्रकार उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर आता प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. पडताळणी पारदर्शक व विश्वासार्ह व्हायची असेल तर ती या अधिकाऱयांमार्फत न करता एखाद्या तटस्थ समितीमार्फत करावी. आपण त्वरित नवीन समिती नियुक्त करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाचे सुशील शेजुळे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.