गुहेमध्ये गेलेला फुटबॉलचा संपूर्ण संघ गायब, फुटबॉल विश्वात खळबळ

सामना ऑनलाईन । बँकॉक

रशियामध्ये २१ वा फुटबॉल विश्वचषक सुरू असतानाच थायलंडमधून फुटबॉल विश्वात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघ आपल्या प्रशिक्षकासह गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या चार दिवसांपासून या संघाचा काहीही पत्ता लागलेला नसून गुफेमध्ये शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु तुफान पावसामुळे १२ किशोरवयीन फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकाचा शोध घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

thai-team01

थायलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या थाम लुआंह नांग नोन गुहेमध्ये गेल्या शनिवारी थायलंडच्या किशोरवयीन फुटबॉल संघातील ११ ते १६ वर्ष वयोगटातील १२ खेळाडू आणि २५ वर्षीय प्रशिक्षक गायब झाले होते. प्रचंड पाऊस आणि भू-स्खलनामुळे गुहेमध्ये हा संघ अडकला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ संघातील खेळाडूंच्या सायकल, बूट आणि इतर साहित्य सापडले होते, त्यानंतर खळबळ उडाली. फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे एक पथक गुहेमध्ये उतरले आहे, परंतु चार दिवसानंतरही त्यांचा शोध न लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड पावसामुळे गुहेमध्ये जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शोध मोहिमेत अडचण येत आहे. तसेच गुहेमध्ये अंधार पसरला असून काही भागामध्ये ऑक्सिजनचीही कमतरता असल्याने बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागत आहे. परंतु आम्ही गेल्या २४ तासांपासून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत आणि लवकरच फुटबॉलपटू पर्यंत पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या