रस्त्यापासून विधिमंडळापर्यंतचा १५ वर्षांचा लढा यशस्वी

32

सामना प्रतिनिधी । ठाणे

कुणी घर देता का घर, अशी याचना आप्पासाहेब बेलवलकर यांनी रंगभूमीवर केली. तशीच काहीशी स्थिती गेली अनेक वर्षे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया समस्त ठाणेकरांची होती. या नरकपुरीतून कधी सुटका होणार, असा सवाल ठाण्याच्या राजकीय रंगमंचावरूनदेखील करण्यात येत होता. शिवसेना येथील गोरगरीबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि घरांसाठी सुरू झाला जबरदस्त लढा. या खडतर लढय़ाला 15 वर्षांनंतर यश मिळाले असून क्लस्टर डेव्हलपमेंटची अंतिम अधिसूचना जाहीर करून शिवसेनेने ठाणेकरांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्यामुळे घरांसाठीची घरघर आता थांबणार असून क्लस्टरमुळे हजारो धोकादायक इमारतींचा पुनर्विकास होऊन ऐतिहासिक ठाणे मोठय़ा दिमाखात स्मार्टपणे उभे राहणार आहे. या अभूतपूर्व यशामुळे शिवसेनेचे ठाणे… ठाण्याची शिवसेना हे नाते अधिकच घट्ट झाले आहे.
एकेकाळी गाव असलेले ठाणे शहर झाले आणि शहराची ही वाटचाल मेगा सिटीकडे सुरू आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हे शहर असल्याने अनेक चाकरमानी येथे राहायला आले. ठाण्यातील वागळे इस्टेट हा भाग तर पूर्वी कारखान्यांमुळे गजबजलेला असायचा.

मुंबईबरोबरच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ व अन्य भागातही मोठय़ा प्रमाणावर अनेक जण ठाण्यात आले आणि येथील मातीशी एकरूप झाले. आजघडीला या शहराच्या लाकसंख्येने 22 लाखांचाही टप्पा पार केला आहे. जुने ठाणे हे पूर्वी अतिशय सीमित होते. आता घोडबंदर, मुंब्रा, दिवा, कळवा, खारेगाव हा भागदेखील विकसित होत असून हजारो इमारती येथे उभ्या राहिल्या. गरजेपोटी अनेकांनी घरे बांधली.

मंत्रालयावरील तो भव्य मोर्चा

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या लढाईतील 4 ऑक्टोबर 2013 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा न भुतो न भविष्यती असा ठरला. हजारो शिवसैनिकांनी तळपत्या उन्हात टेंभीनाक्याहून मंत्रालयाकडे कूच केली. या मोर्चात शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शाखाप्रमुख, महिला आघाडी मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन दिले. तसेच आणखी बळी जाण्याची वाट न पाहता क्लस्टर डेव्हलपमेंटचे धोरण त्वरित जाहीर करावे अशी मागणी केली. आम्हाला राजकीय श्रेय नको, लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, अशा स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. या मोर्चाच्या आठवणी शिवसैनिकांच्या मनात आज पुन्हा एकदा जाग्या झाल्या.

फ्लॅशबॅक…

ठाण्यातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करून दाखवणारच, असा निर्धार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. ते ठाणे महानगरपालिकेत सभागृहनेते असल्यापासूनच क्लस्टरसाठी लढत होते.

क्लस्टरसाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्ष्यवेधी सूचना, तारांकित प्रश्न, स्थगन प्रस्ताव आदी विविध आयुधांचा वापर करून सरकारवर दबाव आणला.

ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह प्रताप सरनाईक, राजन विचारे, रूपेश म्हात्रे, बालाजी किणीकर, दौलत दरोडा आदींनी सरकारला धारेवर धरले. एवढेच नव्हे तर सभागृहाचे कामकाजही बंद पाडले. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांवर निलंबनाची कारवाईदेखील झाली होती.

ठाण्यातील धोकादायक इमारती एकामागोमाग पडून अनेकांचे बळी जाऊनही काँगेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार क्लस्टरची घोषणा करीत नव्हते. अखेर शिवसेनेच्या संतप्त आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधिमंडळातील वाट अडविली होती.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील वारंवार पाठपुरावा करून शिवसेनेने क्लस्टरच्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारने क्लस्टरला मंजुरी दिली, पण त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. काही जण तर कोर्टातही गेले. अखेर पालकमंत्र्यांनी सर्व अडथळे दूर करून गोरगरीबांना न्याय मिळवून दिला.

शिवसेनेने दिलेले वचन पाळले

उशिरा का होईना, पण ठाण्यातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया लाखो गोरगरीब रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. अनेक अडचणी पार करून दशकभराच्या लढय़ाला यश मिळाले असून या लढय़ाचे नेतृत्व करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तसेच क्लस्टरबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेदेखील आभार. ठाणेकरांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिवसेनेने दिलेले वचन पूर्ण केले आहे.
– एकनाथ शिंदे, पालकमंत्री

लकी कंपाऊंडच्या आठवणीने अजूनही थरकाप उडतो

महापालिका क्षेत्रात 30 वर्षांपेक्षाही जुन्या सुमारे 45 हजार इमारती आहेत. साडेतीन हजारांहून अधिक इमारती धोकादायक सिटीत असून तुटलेले स्लॅप, गळक्या टाक्या, मोडकळीस आलेले जीने अशा स्थितीतही रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. काळाच्या ओघात या इमारती जीर्ण झाल्या आणि 1992 पासून आतापर्यंत इमारती कोसळण्याच्या 20हून अधिक घटना घडल्या. त्यात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मुंब्य्रातील बानू अपार्टमेंट, लकी कंपाऊंड या इमाती कोसळण्याच्या घटना आठवताच आजही अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. त्यातूनच क्लस्टर डेव्हलपमेंटची संकल्पना पुढे आली.

आपली प्रतिक्रिया द्या