खूशखबर! ठाणेकरांना ३०० चौरस फुटांचे घर मोफत

24

सामना प्रतिनिधी । ठाणे

धोकादायक इमारतींमध्ये वर्षानुवर्षे जीव मुठीत धरून राहणाऱया लाखो ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे यासाठी शिवसेनेने दिलेल्या लढय़ाला अखेर यश आले आहे. राज्य सरकारने क्लस्टर योजनेची अंतिम अधिसूचना जारी केली असून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया नागरिकांना ३०० चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे. तमाम ठाणेकरांसाठी ही खूशखबर असून खऱया अर्थाने हे शहर स्मार्ट होणार आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंमलबजावणीतील सर्व अडथळे आता दूर झाले असून शिवसेनेने वचनपूर्ती केली आहे. या योजनेमुळे ऐतिहासिक ठाणे शहराचा चेहरामोहराच बदलणार असून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणे सोपे होणार आहे.

न्यायालयाचा हिरवा कंदील

क्लस्टरचा वाद न्यायालयातही गेला. ठाणे महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्टदेखील सादर केला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. क्लस्टरमधील सर्व त्रुटी आता दूर झाल्या असून न्यायालयाने हिरवा कंदील दाखविताच क्लस्टर योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या योजनेसाठी किमान आठ हजार चौरस भूखंडाची आवश्यकता असून झोपडपट्टी व अधिकृत इमारती असल्यास त्याची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ व ४० टक्के एवढी असणार आहे. मूळ योजनेनुसार लाभार्थींना ३०० चौरस फुटांची घरे भाडेतत्त्वावर देण्यात येणार होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेत जीव मुठीत धरून राहणाऱया ठाणेकरांना मोफत घरे मिळावीत असा आग्रह धरला. राज्य सरकारने अखेर त्यास मंजुरी दिल्याने सर्वसामान्य ठाणेकरांच्या घरांचे स्वप्न साकारणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या