ठाणे महानगरपालिकेचे ऑनलाईन कोरोना स्व-चाचणी टूल, तीन हजार जणांनी माहिती भरली

490

महानगरपालिकेच्या ‘डिजी ठाणे’ या प्रणालीद्वारे कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल तयार करण्यात आले आहे. प्राथमिक पातळीवरील कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होणार आहे. आतापर्यंत 30 हजार नागरिकांना याचा संदेश पाठविण्यात आला असून त्यातील 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी ही माहिती भरून पाठविली आहे. आणखी 2 लाख लोकांना हा संदेश पाठविण्यात येणार आहे.

सदरचे टूल https://bit.ly/TmcSa या संकेतस्थळावर उपलब्ध असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या ऑनलाईन स्व-चाचणी टूलचा वापर करावा असे आवाहन आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे. या टूलमध्ये, परदेशातून आलेल्या नागरिकांची किंवा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची बाबत माहिती भरू शकतात. विशेष बाब म्हणजे, या टूलमुळे महानगरपालिकेला चाचणी केलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्डही बघता येतो.

संक्रमण शोधण्यास मदत
या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये करोनासदृश लक्षणे ही मध्यम किंवा तीव्र रूपाची असल्यास अशा व्यक्तीचे‌ वैयक्तिक तपशील महानगरपालिकेपर्यंत त्वरित प्राप्त होतील.तसेच ताबडतोब संबंधित नागरिकाच्या घरी पथकाची भेट दिली जाईल व आवश्यक ते कामकाज जलद गतीने होईल. यामुळे महानगरपालिकेला संभाव्य संक्रमणास अधिक प्रभावीपणे शोधण्यास मदत होणार आहे.

मराठी मध्येही उपलब्ध
सदर स्व-चाचणी टूल प्रत्येकाच्या वापरासाठी मराठी, व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा टूल क्यूआर कोड रूपात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आणि खाजगी दवाखान्यांमध्येही उपलब्ध होणार आहे. जेणेकरुन तिथेही रुग्णांना स्व-चाचणी करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या