पालिकेची धडक कारवाई, कोरोना रुग्णांना लुटणा-या ठाण्याच्या होराईझन हॉस्पिटलची मान्यता रद्द

कोरोनाच्या महामारीत अवाजवी बिले वसूल करून रुग्णांना लुटणाऱ्या ठाण्याच्या होराईझन प्राईम हॉस्पिटलला ठाणे महापालिकेने जबरदस्त दणका दिला आहे. कोविड रुग्णालय म्हणून होराईझन हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पुढील महिन्याभरासाठी हॉस्पिटलची नोंदणीही निलंबित करण्यात आली आहे. कोविड रुग्णांना लुटणा-या हॉस्पिटलवर अशा प्रकारची धडक कारवाई झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असून त्यामुळे  रुग्णसेवेचा ‘बाजार’ मांडणा-या इतर खासगी कोविड हॉस्पिटल्सचे धाबे दणाणले आहेत.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे महापालिकेने वेदांत, काळसेकर, कौशल्या तसेच होराईझन प्राईम या हॉस्पिटलस् ना कोविड रुग्णालयाची मान्यता दिली होती. मात्र कोरोनाच्या महामारीतही काही हॉस्पिटलस् रुग्णांची लूट करत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. यावर निर्बंध घालण्यासाठी पालिकेने निर्धारित केलेल्या शुल्कानुसारच बील आकरण्याची ताकीद सर्व रुग्णालयांना देण्यात आली होती. पण त्यातही पळवाटा काढून रुग्णांची लुबाडणूक सुरूच आहे. हॉस्पिटलची ही लबाडी पकडण्यासाठी पालिकेने ऑडीटर नेमले असून यामध्ये घोडबंदर येथील प्रशस्त, नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळख असलेले होराईझन प्राईम रुग्णालय दोषी आढळले आहे. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी होराईझनवर कारवाई केली आहे.

● ठाणे महापालिकेचे लेखापरिक्षक व उपजिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विशेष ऑडीटरने होराईझन प्राईम हॉस्पिटलच्या घोटाळयाची पूर्ण चौकी केली.

●  2 एप्रिल ते 22 जुलैपर्यंत या हॉस्पिटलमध्ये एकूण 797 रुग्णांवर उपचार करण्यात आले. ऑडीटरकडे तक्रारी आलेल्या 57 बीले तपासण्यात आली असून त्यापैकी 56 बीलांमध्ये 6 लाख रुपयांपेक्षा जास्त गडबड घोटाळा असल्याचे निदर्शनास आले.

● यासंदर्भात ऑडीटरने हॉस्पिटल व्यवस्थापनाला 20 जुलै रोजी नोटीस बजावून दोन दिवसांत खुलासा करण्याची ताकीद दिली. पण हॉस्पिटलने हेकेखोरी दाखवत अद्यापी कोणताही लेखी खुलासा केलेला नाही.

●  या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घोडबंदर येथील होराईझन प्राईम हॉस्पिटलवर कठोर कावाईचा बडगा उगारत जबरदस्त डोस दिला आहे.

–  ● कोविड रुग्णालय म्हणून या हॉस्पिटलची मान्यता आयुक्तांनी रद्द केली असून पुढील महिन्याभरासाठी त्याची नोंदणीही निलंबित केली आहे. त्यामुळे याा रुग्णालयाला कोणत्याही नवीन रुग्णाला दाखल करून घेता येणार नाही.

 ठाणे पालिकेने घेतला होरईझनचा ताबा

होराईझन हॉस्पिटलची मान्यता रद्द झाली असली तरी येथे उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांचे उपचाराविना हाल होणार नाही याची संपूर्ण खबरदारी पालिकेने घेतली आहे. आय.सी. .एम. आर. तसेच शासन निर्णयानुसार हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या उपचाराची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. यासाठी होराईझन हॉस्पिटलचा ताबा घेण्यात आला असून पालिकेच्या वतीने मेडीझन विभागाच्या डॉ. प्रेषिता क्षीरसागर, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे कनिष्ठ लेखापरिक्षक बाळासाहेब कराडे यांची द्विसदस्यीय पथक पूर्णवेळ होराईझन हॉस्पिटलमध्ये तैनात ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या