फाईल क्लिअर करण्यासाठी मागितली 5.3 लाख रुपयांची लाच, वनविभाग अधिकाऱ्यास अटक

ठाण्यातील एका वरिष्ठ स्तरीय वन अधिकाऱ्याला सोमवारी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक बळीराम तुकाराम कोळेकर (57) असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोळेकर यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना त्याच्या सेवेसाठी अनुदान मिळणार आहे. यासंबंधित फाईल क्लिअर करण्यासाठी कोळेकर यांनी त्यांच्याकडे अनुदानातील 5% टक्के रक्कम आपल्याला द्यावी लागेल, असे म्हणत लाच मागितली. या अधिकाऱ्याने कोळेकर यांना 92,000 रुपये दिले. यानंतर या अधिकाऱ्याने याची तक्रार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली.

या अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यानंतर एसीबीने सोमवारी सापळा रचून कोळेकर यांना अटक केली. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एसीबीला त्याच्या कार्यालयाची झडती सुरू असताना एका कपाटातून 12 लाख रुपये सापडले आहेत. एसीबी याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या