शासकीय कर्मचाऱ्यांची नियमानुसार तीन वर्षांत बदली होत असली तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात चार कर्मचारी मात्र एकाच विभागात 15 वर्षांपासून ठिय्या मांडून बसले आहेत. राज्य सरकारचे हे चारही घरजावई महसूल विभाग सोडायला तयार नाहीत. त्यांची कोठेही बदली झाली तरी ते पुन्हा पंधरवड्यात याच विभागात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वाधिक मलईदार विभाग म्हणून ओळख असलेल्या महसूल विभागात या चार घरजावयांकडून नागरिकांची पिळवणूक होत असल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतजमीन बिगरशेती करण्याचे काम केले जाते. जमिनीचे तंटेही येथेच सोडवले जातात. जिल्हाभरात सुरू असलेल्या गौण खनिजावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे हा विभाग सर्वाधिक मलईचा विभाग म्हणून ओळखला जातो. परिणामी या विभागात येण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जाते. याच विभागात काम करणारे कारकून आणि अव्वल कारकून दर्जाचे चार कर्मचारी मात्र याच विभागात गेल्या 15 वर्षांपासून मुक्काम ठोकून आहेत. नियमानुसार एका विभागात कर्मचाऱ्याला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. मात्र या कर्मचाऱ्यांनी 15 वर्षे उलटल्यानंतरही हा विभाग सोडला नाही. या कर्मचाऱ्यांकडून गरजू नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केला आहे. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना महसूल विभागातून तातडीने बाहेर काढा, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे.
यांचा गॉडफादर कोण?
शासकीय कर्मचारी एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त दिवस थांबले तर सर्वत्र आकांडतांडव केले जाते. मात्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागात हे कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून मुक्काम ठोकून आहेत. त्यांच्या विरोधात अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्यांना हटवले नाही. काही वेळा त्यांची बदलीही करण्यात आली आहे. मात्र बदलीनंतर पंधरवड्यात पुन्हा ते याच विभागात आले आहेत. त्यामुळे त्यांचा गॉडफादर कोण, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.