ठाणे- दिवा रेल्वे पुलाचे गर्डर टाकण्यासठी उद्या मुंब्रा बायपास बंद, 5व्या, 6 व्या लाइनचे काम अंतिम टप्प्यात

फोटो- वेदांत कांदळगांवकर

ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या लाइनवर बांधण्यात येणाऱ्या पुलावर रविवारी लोखंडी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा बायपासवर एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी 24 तास या मार्गावरुन कोणतीही वाहतूक होणार नाही. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविल्यामुळे नवी मुंबई आणि कल्याणमध्ये वाहनांची वर्दळ वाढणार असून वाहतूकीची मोठी कोंडी होणार आहे.

गुजरात आणि नाशिकहून जेएनपीटी बंदराकडे जाणारी वाहने मुंब्रा बायपासचा वापर करतात. तसेच जेएनपीटीकडूनही या दोन्ही भागात जाणाऱ्या वाहनांना मुंब्रा बायपासवरुनच जावे लागते. मात्र रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी रविवारी पूर्ण दिवस मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरातहून जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहनांना घोडबंदर मार्गावरून ऐरोली गाठावी लागणार आहे आणि त्यानतंर नवी मुंबईतून पुढचे मार्गक्रमण करावे लागणार आहे. जेएनपीटीतून नाशिक, भिवंडी आणि ठाणे ग्रामिणमध्ये जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल, न्हावडे फाटा, तळोजा एमआयडीसी,खोणी, नेवीळी, कल्याणमार्गे जावे लागणार आहे. नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना आधारवाडी जेलमार्गे पाठविण्यात येणार आहे. रविवारी सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे.

मुंब्रावासीय नवी मुंबईमार्गे ठाण्यात

गर्डर बसविण्यासाठी मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे मुंब्रावासीयांना ठाणे शहर आणि मुंबईत जाण्यासाठी शिळफाटा, महापे मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, रबाळे, ऐरोली मार्गाचा उपयोग करावा लागणार आहे. या दोन्ही शहरांतून पुन्हा मुंब्र्यात जाण्यासाठीही नवी मुंबई मार्गाने जावे लागणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

काम १० वर्षांपासून सुरू

ठाणे आणि दिवा स्थानकांना जोडण्यासाठी पाचव्या आणि सहाव्या लाइनचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. हे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून केले जात आहे. मुंब्रा खाडीकिनाऱ्याच्या दिशेने पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मुंब्रा बोगद्यातून रेल्वे लाइन खाडीवरील एलिव्हेटेड रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी हे गर्डर टाकण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या