ठाण्यात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा

31
सामना ऑनलाईन । ठाणे
योग्य प्रकारे उपचार मिळत नसल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची ताजी घटना ठाणे सिव्हील रुग्णालय येथे घडली आहे. डॉक्टर जावेद शेख आणि डॉक्टर अन्सारी यांना मारहाण करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांनी रुग्णालयात धुडगूस घालत तोडफोड केली. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याआधी मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी ४ दिवस संप केला होता.
ठाण्यातील महागिरी परिसरात एका व्यक्तीला हाताला जखम झाली म्हणून उपचारासाठी ठाणे सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णासोबत असणाऱ्या चार ते पाच जणांनी रुग्णावर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप करत डॉक्टर जावेद शेख आणि डॉक्टर अन्सारी यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयाची तोडफोडही केली. रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने जोपर्यंत हल्लेखोरांना अटक करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला.
आपली प्रतिक्रिया द्या