ठाणे : मुलगा पसंत नव्हता म्हणून चॉकलेटमध्ये विष घालून मारले, तरुणीला अटक

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यामध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीने आपल्या भावी नवऱ्याची विष देऊन हत्या केली आहे. पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून मुलगा पसंत नसल्याने तिने ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीचे घरचे तिचे लग्न जबरदस्तीने एका मुलासोबत लावून देत होते. परंतु तरुणीला मुलगा पसंत नव्हता. त्यामुळे तिने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. तरुणीने त्याला भेटण्यासाठी बोलावले तेव्हा तिने त्याला एक चॉकलेट खाण्यासाठी दिले. भावी पत्नीने एवढ्या प्रेमाणे चॉकलेट दिल्याने तरुणानेही ते आनंदाने घेतले आणि खाल्ले. चॉकलेट खाल्ल्यानंतर काही वेळाने त्याची तब्येत खराब झाली. तरुणाला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. चॉकलेटमध्ये विष मिसळल्याने तरुणाचा मृत्यू झालाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली आणि ज्यावेळी तरुणाची तब्येत बिघडली त्यावेळी तो कुठे, कोणासोबत होता याचा तपास केला. या तपासात पोलिसांनी धक्कादायक माहिती मिळाली. भावी पत्नीनेच तरुणाला चॉकलेटमधून विष दिल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणीची कसून चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.