डोंबिवलीत केमिकल कंपनीच्या गोदामाला भीषण आग, 250 ते 300 कामगार कामावर

1167

डोंबिवली एमआयडीसी ‘फेस 2’मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीमुळे केमिकल ड्रमचे स्फोट सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

मंगळवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी फेस 2 मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीच्या गोदामाला आग लागली. आगीमुळे केमिकल ड्रमचे स्फोट होत असून स्फोटाच्या आवाजामुळे बाजूच्या स्टार कॉलनी परिसरातील लोकं घाबरून सामानासह रस्त्यावर आले आहेत. तसेच औद्योगिक भागातील काही शाळा बंद करून मुलांना घरी पाठवण्यात आले आहे. आग अद्यापही नियंत्रणात न आल्याने अंबरनाथ येथून अग्निशमन गाड्या मागवण्यात आल्या आहेत.

dombivali1

प्राथमिक माहितीनुसार, आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही. आग लागली तेव्हा जवळपास 250 ते 300 कामगार कामावर होते. आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आगीमुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निदर्शनास येत आहे.

dombivali

दरम्यान, या आगीमुळे आकाशामध्ये धुराचे मोठे लोळ उठत आहेत. मेट्रो पोलिटीन कंपनीची आग गेल्या पाच तासांपासून सुरू असून आता शेजारच्या कंपनीकडे आग सरकत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या