नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर, वाकलेले खांब कर्जतवासी दररोज आठ तास अंधारात; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

विजेच्या समस्यांनी कर्जतकर हैराण झाले आहेत. दिवसातून आठ तास वीज गुल असते. वाकलेले खांब, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर, लोंबकळत असलेल्या तारा बदलण्याची वारंवार मागणी करूनही महावितरणही लक्ष देत नसल्याने या भोंगळ कारभाराच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण आजपासून सुरू केले आहे.

कर्जत तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक एकत्रित येऊन त्यांनी कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत महावितरण कार्यालयावर २० जुलै रोजी भव्य असा मूक मोर्चा काढला होता. त्यानंतर महावितरण अधिकारी प्रकाश देवके यांनी कर्जततालुक्यातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण कार्यालयामध्ये ३० जुलै रोजी संघर्ष समितीच्या सदस्याबरोबर चर्चेचे आयोजन केले होते. परंतु या चर्चेमधून काहीच निष्पन्न झाले नाही. उलट प्रकाश देवके यांनी मोर्चाचे गांभीर्य लक्षात न घेता उडवाउडवीची उतरे दिली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या कर्जतवासीयांनी आंदोलन सुरू केले आहे.

अधिकाऱ्याची बदली

या साखळी उपोषणाचा प्रशासनाने धसका घेऊन महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रकाश देवके यांची तडकाफडकी बदली केली. असे असले तरी कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकामध्ये साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासह माजी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, हरिश्चंद्र यादव, अॅड. गोपाळ शेळके यांनी पाठिंबा दिला. उपोषणामध्ये अॅड. कैलास मोरे, अॅड. संदीप घरत, अॅड. चंद्रा चव्हाण, राजेश मिरकुटे, अस्मिता सावंत, हरेश सोनावळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले आहेत.