विकासाचे ‘व्हिजन’ बजेट

सामना प्रतिनिधी । ठाणे

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या ठाणे महानगरपालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प आज आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत सादर केला. त्याआधी अर्थसंकल्पाची प्रत त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांना सुपूर्द केली. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब आदी उपस्थित होते. ३३९० कोटी ७८ लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘विकासाचे व्हिजन बजेट’ असून ठाणेकरांसाठी अनेक हायटेक सुविधा देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पाने ३ हजार कोटींचाही टप्पा ओलांडला असून गेल्या वर्षीपेक्षा ५६० कोटींनी बजेट वाढले आहे. २४ तास पाणीपुरवठा, शाई धरणाच्या कामाला चालना, भुयारी गटार योजना, जिम्नॅस्टिक सेंटर, शूटिंगसाठी स्टुडिओ, स्ट्रीट आर्ट गॅलरी, कळवा हॉस्पिटलचा कायापालट, तलावांचे सुशोभीकरण, पार्किंगची व्यवस्था, पर्यटनास चालना देण्यासाठी जागतिक दर्जाची पारसिक चौपाटी आदी सुविधा तसेच योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ठाणेकरांचे जीवनमान उंचावणारे हे बजेट असून मालमत्ता करात वाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ४८० कोटी रुपयांची भर पडणार आहे.

ठाणे महानगरपालिकेचा ३ हजार ३९० कोटींचा अर्थसंकल्प
– मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव, ४८० कोटींचे उत्पन्न अपेक्षित
– ३६ तलावांचे सुशोभिकरण
– पारसिक चौपाटीसाठी ५० कोटींची तरतूद
– शाई धरणाकरिता २५ कोटी
– आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ईएनटी’ हॉस्पिटल
– सिग्नल शाळेनंतर आता प्लॅटफॉर्म शाळा
– योजनांकरिता बॉण्डद्वारे उभारणार निधी
– ४४ जलकुंभ बांधणार
– पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण
– शूटिंगसाठी स्टुडिओ, पाच ठिकाणी स्ट्रीट आर्ट गॅलरी