ठाणे महापालिका देणार बाळंतविडा, ३ हजार ६०० महिलांना लाभ

111

सामना प्रतिनिधी । ठाणे

महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागात लवकरच कुणी गोविंद घ्या.. कुणी गोपाळ घ्या… हे सूर उमटणार आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या महिलांना पालिका बाळंतविडय़ाची अनोखी भेट देणार आहे. नवजात शिशू संवर्धन या योजनेंतर्गत हा बाळंतविडा देण्यात येणार असून त्यात टोपडे, लंगोट, झबले, दुपटी, बेबी सोप आदी विविध वस्तूंचा समावेश आहे. ३ हजार ६०० महिलांना त्याचा लाभ होणार आहे. गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध प्रकारची विकासकामे करीत असतानाच नवजात बालक तसेच त्यांच्या मातांचीदेखील काळजी घेणारी ठाणे ही पहिलीच महापालिका ठरली आहे. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दरवर्षी अनेक गोरगरीब महिला प्रसूत होत असतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्वत:कडे तसेच बाळाच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. त्यांनाही पालिकेने आधार द्यावा यासाठी बाळंतविडा योजना राबविण्याची संकल्पना समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने मांडली होती. ती मान्य करण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने २० जून रोजी होणाऱया महासभेत मांडण्यात येणार आहे. त्यास मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

समर्थ भारत व्यासपीठाची मदत

बाळंतविडा प्रकल्प राबविण्यासाठी महापालिका समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेची मदत घेणार असून लाभार्थींची यादी तयार करणे तसेच नवजात बालक व मातांना सर्व वस्तू व्यवस्थित मिळतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी खास व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या बाळंतविडय़ात बॅग, टोपडे, झबले यांबरोबरच बेबी पावडर, बेबी ऑइल, नाचणी सत्व, सॅनेटरी नॅपकिन्स या आवश्यक वस्तूही देण्यात येणार आहेत.

बचत गटांना मिळणार हक्काचा रोजगार

बाळंतविड्यातील सर्व वस्तू बचतगटांतील महिला तयार करणार असून त्यामुळे त्यांना हक्काचा रोजगारदेखील मिळणार आहे. टोपडे, लंगोट, झबले, दुपटी, सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याचे प्रशिक्षणदेखील महिलांना दिले जाणार आहे. पालिकेच्या या अनोख्या योजनेचे महिलांनी स्वागत केले असून नवजात बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाळी पूरक आहार तसेच अन्य गरजांकडेही महापालिका लक्ष देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या