ठाणे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल स्वतः मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीच केली आहे. शहर विकास विभागातील मनमानीपणाचा पंचनामाच त्यांनी केला असून नियमबाह्य नकाशे मंजूर करणे, बिल्डरांना आर. झोनचा फायदा, इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही विविध प्रकल्पांना सीसी, ओसी देणे अशी कामे राजरोसपणे होत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. शहर विकास विभाग बिल्डरांच्या फायद्यासाठी की नागरिकांसाठी, असा थेट सवाल करण्यात आला असून येथील अधिकाऱ्यांच्या कारभारावर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा, अशी मागणीही त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना खास पत्र पाठवून केली आहे. ठाणे महापालिकेचा कारभार गेली अडीच वर्षे ‘मिंधे बोले.. अधिकारी डोले’ असा सुरू आहे. मात्र त्यावर आता त्यांच्याच गटाच्या आमदाराने प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
ठाणे पालिकेच्या शहर विकास विभागाकडून चुकीचे प्रकार घडले आहेत. यावर्षामध्ये विकासाचे निर्णय न घेता व्यक्तिगत आर्थिक हिताचे अनेक चुकीचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे जुने अधिकारी निवृत्त झालेले आहेत तर महानगरपालिकेची माहिती नसलेले सहाय्यक संचालकाचे पद हे फक्त खुर्ची उबवण्यासाठी व स्वतःचे आर्थिक हित जोपासण्यासाठी काम करीत असल्याचा आरोप मिंध्यांचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयुक्तांनी या प्रकरणात जातीने लक्ष देणे गरजेचे असून या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे आहेत आरोप
विहंग व्हॅली ते हावरे सिटीपर्यंतचा ४० मीटरचा रस्ता हा ग्रीन झोनमधून वळवण्यात आलेला आहे. विकासकांच्या फायद्याच्या दृष्टीने या रस्त्यावरील आर. झोनचा चटई निर्देशांक व नियम धाब्यावर बसवून विकासकांना आर. झोनचा फायदा देण्यात आलेला आहे.
घोडबंदर येथील हिरानंदानी वन शेजारील माण डेव्हलपर्सच्या जागेवर आदिवासी जमीन तसेच सनद व यू.एल.सी. कायद्यांतर्गत अनेक त्रुटी असल्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी प्रकरण नामंजूर केले होते. परंतु आता भूखंडावर नियमबाह्यरीतीने नकाशे मंजूर करण्यात आले आहेत.
शिवाईनगर येथील निळकंठ हाईटस् या सोसायटीचा एफएसआय त्याच सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात विकासक वापरत असल्याची तक्रार सोसायटीच्या सभासदांनी दिली असतानाही त्याकडे दुर्लक्ष.