शिंदे गटाच्या कार्यालयात बंगाली बाबाचे बस्तान, दिव्यात बोगस डॉक्टरने घेतला 12 वर्षांच्या देवेंद्रचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवा परिसरात एका बोगस डॉक्टरने 12 वर्षांच्या निष्पाप मुलाचा बळी घेतला असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. देवेंद्र सिंग असे मृत मुलाचे नाव असून शिशिर राय याने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा बोगस डॉक्टर दिव्यात बंगाली बाबा म्हणून प्रसिद्ध होता. धक्कादायक बाब म्हणजे या बाबाने श्लोकनगर येथील शिंदे गटाच्या कार्यालयात आपले बस्तान मांडले होते. तिथूनच तो रुग्णांवर उपचारदेखील करत होता. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस डॉक्टर शिशिर राय याने देवेंद्र सिंगला एक औषध दिले होते. या औषधानंतर काही मिनिटांतच मुलाची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने डोंबिवली आणि त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 1 जूनला देवेंद्रचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बोगस डॉक्टर शिशिर राय पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून दिव्यातील बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.

सुया, गोळ्यांचे रिकामे बॉक्स सापडले

दिव्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची बोंब उठताच ठाणे पालिकेच्या आरोग्य पथकाने स्पॉटवर जाऊन चौकशी केली. बंगाली बाबाने देवेंद्रला सलाईन लावली असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिशिर राय हा श्लोकनगर येथील शिंदे गटाच्या कार्यालयात बसत होता. त्याठिकाणी एक बाकडा, खुर्ची, निडल, सुया, ड्रेसिंगचे सामान, गोळ्यांचे रिकामे बॉक्स सापडले असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

नेमके कोणते औषध दिले, तपास सुरू

बोगस डॉक्टर शिशिर राय याने देवेंद्रला नेमके कोणते औषध दिले होते आणि ते कोणत्या मेडिकल स्टोअरमधून आणले होते? वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोंदणी व परवाने आहेत का? याचा तपास आरोग्य विभागाचे पथक तसेच मुंब्रा पोलीस करत आहेत.