विकृत ‘शिंदे’ला ठाणेकर विद्यार्थिनी शिकवणार धडा; पोलिसांनी 10 हजार मुलींना दिल्या सुरक्षेच्या टिप्स

बदलापुरातील लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचे काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटर झाले. मात्र असे नराधम बदलापुरातच नाही तर अनेक ठिकाणी असण्याची शक्यता असल्याने त्यांना चाप लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आहे. याकरिता पोलिसांनी गेल्या दीड महिन्यात 28 हून अधिक शाळांमधील दहा हजार विद्यार्थिनींशी वन टू वन संवाद साधत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यामुळे एखादा विकृत ‘शिंदे’ आडवा आल्यास या मुलींना त्याला धडा शिकवता येणार आहे.

राज्यात महिला आणि लहान मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता महिला कुठेच सुरक्षित नाहीत. त्यातच बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकारणानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील कॉज या सामाजिक संस्था आणि ठाणे पोलिसांनी पुढाकार घेत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेद्वारे शाळेमधील विद्यार्थिनीसोबत थेट वन टू वन चर्चा करण्यात येत आहे. तसेच मुलांसोबत पालकांनादेखील ठाणे पोलिसांनी सध्याच्या वातावरणाची जाणीव करून दिली. पालकांनी आपल्या पाल्याची काळजी कशी घ्यावी, काय करावे, काय करू नये, अशा महत्त्वाच्या काही टिप्स पोलिसांनी मुलींना दिल्या. बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी

मुली ढसाढसा रडल्या

शहरातील एकूण 28 नामांकित शाळा आणि महाविद्यालयात गेल्या दीड महिन्यापासून संरक्षणाचे धडे दिले जात आहेत. विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना अनेक गोष्टी उलघडल्या गेल्या आहेत. आपल्यावर यापूर्वी आलेला प्रसंग आठवून काही मुली ढसाढसा रडल्या. तर काहींनी आपले अनुभवदेखील सांगितले. दरम्यान यावेळी मुलींनीही अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

“सध्या सोशल मीडियाचा क्रेज असल्याने प्रत्येक मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जात असून मुलासोबत पालकांचे कान टोचले पाहिजे. ‘कॉज’ या सामाजिक संस्थेकडून गेली अनेक वर्षे जनजागृतीचे कार्यक्रम हाती राबवले जात आहेत. यातून समाजाला चांगली दिशा देण्याचे काम आम्ही करीत आहोत. आम्ही सुरू केलेला उपक्रम मोफत असून या उपक्रमाचा नक्कीच मुलांना फायदा होईल.”

कल्पना मोरे, अध्यक्षा, कॉज फाऊंडेशन