बांधकाम साईटवरील कामगारांच्या झोपड्यांमधील मलमूत्र संरक्षक भिंतीला भगदाड पाडून बिल्डरने थेट शाळेच्या प्रांगणात सोडले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या गंभीर प्रकाराची दखल घेत दैनिक ‘सामना’ वृत्तपत्रात शनिवारी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बिल्डरची धावाधाव सुरू झाली. कळव्याच्या शाळेतील सांडपाणी रोखण्यासाठी बिल्डरने तब्बल 50 कर्मचाऱ्यांची टीम कामाला लावली आहे. तसेच या बिल्डरने शाळेच्या मैदानात साचलेली घाण देखील साफ करून दिली आहे.
कळवा येथील मुंबई-पुणे रस्त्यावर असलेल्या सह्याद्रीनगर येथे सहकार विद्या प्रसारक मंडळाची शाळा आहे. या शाळेत जवळपास 4 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा लाडका मित्र अजय आशर या बिल्डरच्या नवीन टॉवरचे बांधकाम सुरू असून मजुरांनी वसाहत बांधली आहे. दरम्यान कामगारांच्या वसाहतीमधील मलमूत्रयुक्त सांडपाणी मुख्य नाल्यामध्ये न सोडता शाळेच्या भिंतीला चार ठिकाणी फोडून ते सांडपाणी शाळेच्या आवारात सोडले होते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असून बऱ्याच विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यू, कावीळ यांसारखे आजार झाल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या.
भगदाडेही बुजवण्याचे काम सुरू
बिल्डरला जाग येताच शाळेच्या मैदानावर पसरलेली संपूर्ण घाण साफ करून देण्यात आली आहे तर बांधकाम साईटवरील बंद केलेली गटारेदेखील साफ करून सांडपाणी त्यात सोडण्यात आले आहे. तसेच पत्रे टाकून मुख्य नाला बुजवण्यात आला होता. पत्रे कापण्याचे काम सुरू असून संरक्षक भिंतीला पाडलेली भगदाडेदेखील बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
■ आशर या बांधकाम व्यावसायिकाच्या या कारनाम्याची तक्रार शाळेच्या व्यवस्थापनाने ठाणे पालिका आयुक्त यांच्याकडे केली. मात्र पालिका अधिकाऱ्याकडून कोणतेच पाऊल उचलले जात नव्हते.
■ शाळेतील हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीने नाक मुठीत घेऊन शाळेत जावे लागत होते. शाळेतील मुलांना गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजाराने ग्रासले होते.