तरुणांनो… रेल्वे भरतीच्या जाहिरातींपासून सावधान ! 14 तरुणांना 14 लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरी देतो असे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडवणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ललित शक्ती असे गंडवणाऱ्या महाठगाचे नाव असून तो विविध नावाने आपली ओळख पटवून फसवणूक करत होता. त्याने सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून १४ तरुणांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून जवळपास १४ लाख रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नोकरीच्या नावाने सुशिक्षितांची फसवणूक करणारा मोहित डिसोझा हा ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक १च्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून मोहित डिसोझा याला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याचे खरे नाव ललित शक्ती असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हा भामटा मोहित डिसोझा, करण अरोरा, करण जाधव असे नाव वापरून तरुणांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र, आयडी कार्ड व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. ललितविरोधात या आधीदेखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याने पूर्वी फसवणूक केलेल्या लोकांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने पुन्हा गंडा घालण्यास सुरुवात केल्याची माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

सोशल मीडियावर जाहिरात

सुशिक्षित तरुणांना गंडा घालण्यासाठी हा भामटा सोशल मीडियावर जॉब.. जॉब.. जॉब.. अशी जाहिरातबाजी करायचा. रेल्वेमध्ये भरती सुरू असल्याच्या जाहिराती टाकायचा. संपर्क साधणाऱ्या तरुणांकडून कागदपत्रे घेऊन त्यांना बनावट रेल्वे विभागाचे फॉर्म भरून नियुक्तीपत्र तयार करत होता. हे नियुक्तीपत्र तयार करण्यासाठी खर्च करावा लागेल, असे सांगून लाखो रुपये उकळायचा.