धो डाला… दुसऱ्या दिवशीही पावसाची तुफान बॅटिंग

25

सामना प्रतिनिधी । ठाणे

मान्सूनच्या पीचवर पावसाने सलग दुसऱया दिवशी तुफान बॅटिंग करीत सबको धो डाला.. पाऊस मैदानात काहीसा उशिरा उतरला खरा, पण चौकार, षटकार ठोकत त्याने अखेर बाजी मारली. रात्रभरच्या तुफानीमुळे आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे क्लिन बोल्ड होत ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ ही स्थानके गर्दीने ओव्हरपॅक झाली. वासिंदजवळ कामायनी एक्सप्रेसचे इंजिन बिघडल्याने कल्याण ते कसारा दरम्यानच्या वाहतुकीचा तर सकाळी गर्दीच्या वेळी बोजवारा उडाला.

मुंब्रा

पावसामुळे बायपास रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शीळ रोड येथे महावितरणच्या वीजवाहिनीवर झाड कोसळले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला.

कसारा

खर्डी-कसारादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडल्याने लोकलची वाहतूक ठप्प झाली. कसाऱयाहून मुंबईकडे जाणाऱया दोन लोकल रद्द केल्या. दुपारपर्यंत कसाऱयात एकही लोकल आली नाही.

ठाणे

गावदेवीजवळील जुन्या पत्रकार भवनच्या इमारतीवर आज मोठे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र ही इमारत धोकादायक झाल्याने ती लवकरच रिकामी करण्यात येणार आहे.

उल्हासनगर

गोल मैदान परिसरात नाला तुंबल्याने त्यातील पाणी आजूबाजूला पसरले आहे. स्टेट बँक चौक, काजल पेट्रोलपंप, आशीर्वाद सोसायटी, सम्राट अशोकनगर, करोतियानगर या सखल भागात आज पाणी साचल्याने रहिवाशांचे हाल झाले. शहरात विविध ठिकाणी सहा झाडे कोसळली.

कामायनी एक्स्प्रेस, मालगाडीचे इंजिन बिघडले
वासिंद-आसनगाव स्थानकादरम्यान कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अर्धा तास मध्य रेल्वे ठप्प झाली तर दुपारी खर्डीनजीक मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पुन्हा लोकल सेवा विस्कळीत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या