ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; यापेक्षा बिहार बरा! खर्‍या गुन्हेगारांना अटक करा, शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मिंधे गटाचे गुंड बेसावध शिवसैनिकांवर हल्ला करतात. पोलीस ठाण्याला हजारोंच्या संख्येने घेराव घालतात. सहा तास पोलीस ठाणे वेठीला धरतात आणि पोलीस अधिकार्‍यांसमोरच शिवसैनिकांना हातपाय तोडण्याची धमकी देतात. ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे साफ तीनतेरा झाले आहेत. यापेक्षा बिहार बरा, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी आज केला. याप्रकरणात शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि खर्‍या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या किसननगर, भटवाडी येथील कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक 14 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांच्यासह अनेक पदाधिकारी आले होते. यावेळी मिंधे गटातील माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी साथीदारांसह बेसावध शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यात उपशहरप्रमुख दीपक साळवी व हेमंत नार्वेकर यांना अक्षरश: लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सुमारे 150 ते 200 जणांचा जमाव चालून आला होता.

ठाण्यातील या राड्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी खासदार राजन विचारे पदाधिकार्‍यांसह गेले असता मिंधे गटाच्या तब्बल 800 ते 1000 गुंडांनी पोलीस ठाण्यालाच वेढा घातला. त्यांनी रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत हैदोस घालत पोलीस ठाणे वेठीस धरले. धक्कादायक म्हणजे 19 शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत या मागणीसाठी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना निवेदन दिले. तसेच शिवसैनिकांना मारहाण करणार्‍या गुंडांना अटक करा, अशी मागणीही करण्यात आली.

शहराच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना

या प्रकरणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारे यांनी मिंधे गटाच्या दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ठाण्याच्या इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना असून पोलिसांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाण्यासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक सध्या सुरक्षित नाही. त्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस आदी उपस्थित होते.

पोलीस दबावाखाली काम करीत आहेत

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पोलीस, जनता तसेच लोकप्रतिनिधींना वेठीला धरण्याचे काम सध्या सुरू असून आयुक्तांसह पोलीसही दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप राजन विचारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिवसेनेचे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांच्यावर चेन स्नॅचिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. कारखानीस हे उच्च शिक्षित असून असा आरोप करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांची चिथावणी

ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांवर करण्यात आलेला हल्ला हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिथावणीमुळेच झाला असल्याचा गंभीर आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. शिवसेनेचे दीपक साळवी, हेमंत नार्वेकर आणि मधु भोईर या निष्ठावंतांना योगेश जानकर नावाच्या गुंडाने मारले. एवढेच नव्हे तर श्रीनगर पोलीस ठाण्याला सहा तास वेठीला धरले. ठाण्यात पूर्वी असे प्रकार कधीच झाले नाहीत. मुख्यमंत्रीच याला जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांचा आदर करा हीच आनंद दिघे यांची शिकवण

मिंधे गटाच्या गुंडांनी शिवसैनिकांना मारहाण केल्यानंतर जमावावर लाठीमार करण्यात आला. मात्र या गुंडांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली, पाण्याची बाटली फेकली. या घटनेचा उल्लेख करीत राजन विचारे यांनी सांगितले की, धर्मवीर आनंद दिघे यांनी नेहमीच आम्हाला पोलिसांचा आदर करावा, अशी शिकवण दिली. त्याचेच अनुकरण आम्ही करीत आहोत. मात्र ज्या दिवशी पोलिसांची दहशत संपेल त्यादिवशी आपल्या आयाबहिणींवर अत्याचार होऊन गुंडाराज येईल, असा इशाराच त्यांनी दिला.