
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मिंधे गटाचे गुंड बेसावध शिवसैनिकांवर हल्ला करतात. पोलीस ठाण्याला हजारोंच्या संख्येने घेराव घालतात. सहा तास पोलीस ठाणे वेठीला धरतात आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोरच शिवसैनिकांना हातपाय तोडण्याची धमकी देतात. ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेचे साफ तीनतेरा झाले आहेत. यापेक्षा बिहार बरा, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी आज केला. या प्रकरणात शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि खऱ्या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या किसन नगर, भटवाडी येथील कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक 14 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांच्यासह अनेक पदाधिकारी आले होते. या वेळी मिंधे गटातील माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी साथीदारांसह बेसावध शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यात उपशहरप्रमुख दीपक साळवी व हेमंत नार्वेकर यांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सुमारे 150 ते 200 जणांचा जमाव चालून आला होता. ठाण्यातील राडय़ाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी खासदार राजन विचारे पदाधिकाऱ्यांसह गेले असता मिंधे गटाच्या तब्बल 800 ते 1000 गुंडांनी पोलीस ठाण्यालाच वेढा घातला. त्यांनी रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत हैदोस घालत पोलीस ठाणे वेठीस धरले. धक्कादायक म्हणजे 19 शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत या मागणीसाठी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना निवेदन दिले. तसेच शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करा, अशी मागणीही करण्यात आली.
शहराच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना
या प्रकरणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारे यांनी मिंधे गटाच्या दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ठाण्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी ही घटना असून पोलिसांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाण्यासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक सध्या सुरक्षित नाहीत. त्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला. या वेळी लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस आदी उपस्थित होते.
पोलिसांचा आदर करा हीच आनंद दिघे यांची शिकवण
मिंधे गटाच्या गुंडांनी शिवसैनिकांना मारहाण केल्यानंतर जमावावर लाठीमार करण्यात आला. मात्र या गुंडांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली, पाण्याची बाटली फेकली. या घटनेचा उल्लेख करीत राजन विचारे यांनी सांगितले की, धर्मवीर आनंद दिघे यांनी नेहमीच आम्हाला पोलिसांचा आदर करावा, अशी शिकवण दिली. त्याचेच अनुकरण आम्ही करीत आहोत.