ठाणे: शिवसेनेच्या लढाईला यश, धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना मिळेल नवे हक्काचे घर

80

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य मिळणार आहेत. मूळ योजनेत ही घरे भाडेतत्त्वावर देण्यात येणार होती. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सादर झालेल्या सुधारित योजनेनुसार आता ही घरे मालकी हक्कानेविनामूल्य देण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाने नुकताच योजनेला हिरवा कंदिल दिल्यानंतर राज्य शासनाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली. ठाणेकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी शिवसेनेने दिलेला दशकभराचा लढा अखेरीस सफल झाला असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून या लढ्याचे नेतृत्व करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आणि या योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

क्लस्टर योजनेकरता केलेल्या १५ वर्षांच्या संघर्षाचे अखेर चीज झाले असून आता यापुढे पावसाळ्यात शहरातील धोकादायक इमारती कोसळून निष्पापांचे बळी जाणार नसल्याची भावना पालकमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. या योजनेसाठी किमान ८ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे आणि सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी क्लस्टर योजनेकरता दिलेल्या तीव्र लढ्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारने या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र,त्यात असंख्य त्रुटी होत्या, तसेच हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेतही अडकला. पालकमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी या योजनेतील त्रुटी दूर करण्यास प्राधान्य देत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सोशल इम्पॅक्ट असेसमेंट उच्च न्यायालयाला सादर केला. तसेच, मूळ योजनेनुसार लाभार्थींना ३०० चौरस फुटांपर्यंतची घरे भाडेतत्त्वावर देण्यात येणार होती. परंतु, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेत धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना ही घरे विनामूल्य देण्याचा आग्रह धरला.राज्य सरकारनेही अनुकुल भूमिका घेतल्यानंतर अलिकडेच उच्च न्यायालयाने ही योजना लागू करण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. क्लस्टर योजनेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नगरविकास १चे प्रधान सचिव नितीन करीर आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांचेही आभार शिंदे यांनी मानले.

ठाण्यात क्लस्टर मंजूर होण्याकरता विधानसभेत दिलेल्या प्रदीर्घ लढ्याची आठवण ताजी असून त्याकरता अनेकवेळा निलंबित देखील झालो असल्याचे पालकमंत्री शिंदे म्हणाले. विधानसभेत लक्षवेधी, तारांकित प्रश्न,स्थगन प्रस्ताव इत्यादी संविधानिक आयुधांच्या माध्यमातून वेळोवेळी क्लस्टरचा लढा उभा केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वाट देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अडवली होती. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ते मंत्रालय असा मोर्चा देखील काढला होता. प्रताप सरनाईक, राजन विचारे, रुपेश म्हात्रे,बालाजी किणिकर, दौलत दरोडा आदी शिवसेनेचे सर्वच लोकप्रतिनिधी, ठाणे महापालिकेतील पदाधिकारी, त्याचबरोबर अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही या लढ्यात साथ दिली. या सर्व लढ्याला अखेर न्याय मिळाला असून हा ठाणेकर जनतेचा विजय असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या