ठाण्यात सुरू आहे तयारी जल्लोषाची

ठाणे मतदान सुरू झाल्यानंतर आता तयारी सुरू झाली आहे ती विजयोत्सवाचीमतदानाचा वाढलेला टक्का आणि बूथनुसार झालेले मतदान याची आकडेमोड केल्यानंतर विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी जल्लोषाची फुल टू तयारी केली आहे. हारतुरे, पेढे, मिठाई, फटाक्यांचा कडकडाट आणि ढोलताशांचा दणदणाट व्हावा यासाठी आजच ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. एरिया आणि गल्ल्यांतही होर्डिंग लावण्याची तयारी झाली असून आता प्रतीक्षा आहे ती फक्त विजयी नाव घोषित होण्याची.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ढोल-ताशांच्या दणदणाटाबरोबरच चाहत्यांचे तोंड गोड करण्यासाठी  आजच विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी पेढे, काजू कतली तसेच बर्फीची ऑर्डर दिली आहे. ठाणे महापालिकेत १३१ उमेदवार निवडून जाणार असल्याने अंदाजे तीन हजार किलो पेढे, बर्फीची ऑर्डर दुकानदारांना दिली असून आजपासून ठाण्याच्या नामवंत मिठाई विक्रेत्यांच्या कारागीरांनी तयारी देखील सुरू केली आहे.

निवडून आलेल्या विजयी उमेदवाराचे स्वागत बुके भेट देऊन तसेच पुष्पहार घालून केले जाणार असून त्यासाठी हार तुऱयांचीही ऑर्डर अनेकांनी आपल्या भागातील दुकानदारांकडे ऍडव्हान्समध्ये दिली आहे. विजयी मिरवणुका काढण्यास निकालाच्या दिवशी परवानगी नसली तरी ऍडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे.. निकालानंतर फटाक्याचा धुमधडाकाही जोरात होणार असून सुतळी बॉम्ब ,लक्ष्मी फटाके, आकाशात उडणारे आकर्षक रंगीबेरंगी फटाक्यांचा फ्रेश स्टॉक मिरवणुकीसाठी सज्ज असल्याचे  फटाके विक्रेते नितीन खाडे याने सांगितले.

निकालानंतर तूट भरून निघेल

महापालिका निवडणुकांचा धुरळा उडल्यानंतर राजकीय सभांमुळे धंदा चांगलाच वधारला होता. मधल्या आचारसंहितेच्या काळात थोडासा धंदा मंदावला तरीही आता निकालानंतर पुष्पगुच्छ हारांच्या विक्रीने ही तूट भरून निघणार असल्याचे हरिनिवास येथील पुष्पगुच्छ विक्रेते शंकर यांनी सांगितले. निवडणुकीचे निकाल आणि महाशिवरात्रीचा योग साधून नवनवीन मिठाई उपलब्ध करून देणार असल्याचे प्रशांत कॉर्नरचे मॅनेजर प्रदीप सकपाळ यांनी सांगितले. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आमचीही जय्यत तयारी सूरू असून गेले पंधरा दिवस चाळीस कलाकार तालीम करीत असल्याचे शंभुराजे ढोलताशा पथकाचे प्रसन्न माने यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या