ठाणे स्मार्टसिटी लिमिटेडसाठी आकाश कारेकर यांनी रेखाटलेल्या बोधचिन्हाची निवड

31

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे स्मार्टसिटी लिमिटेड कंपनीने स्मार्टसिटीसाठी बोधचिन्ह तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुलुंड येथील आकाश कारेकर यांनी रेखाटलेले बोधचिन्ह विजेते ठरले.

ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड या कंपनीने बोधचिन्हासाठी घेतलेल्या स्पर्धेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जवळजवळ २०० हून अधिक जणांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी रु. २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. हा पुरस्कार आकाश कारेकर यांनी पटकावला. ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते कारेकर यांचा गौरव करण्यात आला.

स्पर्धेत विजयी ठरलेल्या इतर चार बोधचिन्हांसाठी अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या चार गुणी कलावंतांचा प्रत्येकी ५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विजेत्यांशी ठाणे पालिका आयुक्त सुनील चव्हाण यांनी संवाद साधला यावेळी कारेकर यांनी त्यांच्या बोधचित्राची संकल्पना समजावून सांगितली. ठाणे म्हणजे वेगाने वाढणारी लोकसंख्या, रोजगारासाठी संधी निर्माण करणारे शहर, तलावांचे शहर, स्वच्छ व सुंदर शहर, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. ठाण्याचे पर्यावरण आरोग्यदायी आहे. या सर्व बाबींचा विचार करुन त्यांचे प्रतिनिधित्व ज्या बोधचिन्हातून होईल असे बोधचिन्ह तयार केल्याचे कारेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या