टीएमटीचा २९ वा वर्धापनदिन, ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणार

सामना प्रतिनिधी । ठाणे

परिवहन सेवेच्या वाटचालीत वारंवार स्पीडब्रेकर आले. मात्र मागील २९ वर्षे ही आव्हाने खडतरपणे पेलत सेवा अखंड सुरू आहे. यामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा असून ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊन त्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाईल, असे सूतोवाच शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ठाणे परिवहन सेवेच्या २९ व्या वर्धापनदिनी आयोजित सोहळ्यात ते राम गणेश गडकरी रंगायतन येथे बोलत होते.

वाढत्या ठाणे शहरासोबत टीएमटी सेवा अधिकाधिक सक्षम करण्याची गरज आहे. ही सेवा इतर परिवहन सेवेत विलीन करण्याच्या वावड्याही उठत होत्या. त्यावेळी शिवसेना कायम सक्षमपणे येथील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. आजमितीस टीएमटीच्या ताफ्यात ३५० बसेस धावत आहेत. भविष्यात ६५० बसेसची गरज आहे. ती गरजही निश्चित पूर्ण केली जाईल आणि टीएमटीची सेवा ही देशातील एक नंबरची सेवा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के, परिवहन समिती सभापती अनिल भोर, ठाणे महापालिका उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुधीर नाकाडी, परिवहन समितीचे सदस्य दशरथ यादव, राजेंद्र महाडिक, जेरी डेव्हिड, प्रकाश पायरे, संजय भोसले, साजन कासार, राजेश मोरे, सचिन शिंदे, तकी चेऊलकर, हेमंत धनावडे आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचे दर्शन
टीएमटी वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सेवेच्या कर्मचाऱ्यांनी अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांच्या मार्गदर्शनखाली ‘कथुली’ हे नाटक सादर केले, तर परिवहन सेवेत विशेष कामगिरी केलेल्या शेखर शिंपी, शिवाजी कुर्हाडे, विवेक (बाळा) परब, दिलीप देवकर, सुनील ठाकरे, राजेंद्र खोपडे, विलास सुकाळी, दिलीप जुगदर, योगेश पाठक, राजेश जाधव, मोहन पानसरे, प्रतिभा घाडगे आदी कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या