एसी लोकलच्या पसंतीवर ठाणेकरांची मोहर

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकलला उदंड प्रतिसाद मिळत आहे . सध्या मध्ये रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या 56 फेऱ्या चालवण्यात येत आहेत . मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात एसी लोकलला सर्वाधिक प्रवासी लाभत असून डोंबिवली स्थानकातून सर्वाधिक उत्पन्न मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे . मध्य रेल्वेच्या एसी लोकलने फेब्रुवारी ते जुलै सहा महिन्यांत 14 कोटी 76 लाख 87 हजार 888 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एसी लोकलला ठाणे स्थानकात सर्वाधिक प्रवासी संख्या लाभली. येथे दररोज सरासरी 4,500 प्रवासी प्रवास करतात . तर त्यानंतर डोंबिवली स्थानकातून रोज 4000 प्रवासी प्रवास करतात. त्याखालोखाल अनुक्रमे कल्याण – 3880, मुलुंड – 1520, सीएसएमटी – 1520 अशी प्रवासी संख्या आहे.

गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये असलेली एसी लोकलची रोजची सरासरी प्रवासी संख्या 5,939 वरुन जुलै महिन्यात 34,808 प्रवासी इतकी वाढली आहे . म्हणजे रोजची प्रवासी संख्या सहा पटीने वाढली आहे.

सध्या एसी लोकलने प्रवास करणे सर्वात किफायतशीर असून ट्रॅफिक जामची झंझट नसल्याने ओला आणि उबरपेक्षा मुंबईकर एसी लोकलने प्रवास करणे पसंत करीत आहेत. 5 ऑगस्टपासून एसी लोकलचे सिंगल जर्नी तिकिटाचे दर पन्नास टक्के कमी झाल्यानंतर प्रतिसाद वाढला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे सहा एसी लोकल असून एक मेंटेनन्सकरिता यार्डात ठेवण्यात आली आहे. तर उर्वरित लोकलच्या 56 फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

डोंबिवलीत तीन कोटींचे उत्पन्न

डोंबिवली स्थानकात सहा महिन्यांत 94 हजार 932 तिकिटांची खरेदी झाली असून 7 लाख 46 हजार 172 प्रवाशांद्वारे 3 कोटी 41 लाख 53 हजार 610 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे . तर ठाणे स्थानकात 84 हजार 309 तिकिटे विकली जाऊन 8 लाख 11 हजार 184 प्रवाशांद्वारे 2 कोटी 15 लाख 52 हजार 410 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे .

तिकीट विक्रीत टॉप पाच स्थानके

डोंबिवली – 94,932
ठाणे – 84,309
कल्याण – 77,412
सीएसएमटी – 70,444
घाटकोपर – 53,512