ठसा…गुलाबताई गोरेगावकर

163

मुंबईच्या गिरगावातील गावदेवीच्या इतिहासात राधा निवास बंगला मैलाचा दगड म्हणून मुंबईकरांना प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्र जगन्नाथ गोरेगावकर यांच्या बांधकाम उत्कृष्ट कलेचा नमुना आहे. हरिश्चंद्रांनी मध्यमवर्गासाठी गिरगाव, गावदेवी, दादर येथे गोरेगावकरांच्या चाळी उभ्या केल्या. बांधकामतज्ञ हरिश्चंद्र जगन्नाथ गोरेगावकर यांचे नाव राधा निवासच्या समोरील मार्गाला मुंबई महानगरपालिकेने सोनेरी अक्षरात नामफलक करून त्यांची स्मृती कायम ठेवली आहे. याच गोरेगावकर घराण्यातील वसंतराव हे त्याकाळातील नामवंत आर्किटेक्ट होते. त्याच्ंया पत्नी गुलाबताई यादेखील विद्याविभूषित होत्या. त्यांचा जन्म शामराव रघुनाथ रावते यांच्या कुटुंबात १९१७ मध्ये झाला. गावदेवी परिसरात त्यांचे बालपण गेले व शालेय शिक्षण सेंट कोलंबो हायस्कूलमध्ये झाले. चौपाटी येथील विल्सन महाविद्यालयातून त्या १९४० मध्ये कला शाखेतून पदवीधर झाल्या. त्यांनी १९४३ पासून नायगाव सोशल सर्व्हिस सोसायटीच्या व्यवस्थापक मंडळावर राहून कामगार वस्तीमध्ये महिलांसाठी व बालकांसाठी समाजसेवेचे कार्य सुरू केले. डॉ. काशीबाई नवरंगे यांनी त्यांची सेवावृत्ती व कार्य करण्याची तळमळ हेरून त्यांना गावदेवी येथील आर्य महिला समाजात कार्य करण्यास प्रवृत्त केले. १९५४ ते १९८४-८५ पर्यंत त्यांनी आर्य महिला समाजामध्ये कार्य केले. तेथे त्यांनी १५ वर्षे सन्माननीय चिटणीसपद भूषविले. १९८६ सालापासून त्या गावदेवी येथील श्री ग्रामदेवी देवस्थान येथे एकूण २७ वर्षे व्यवस्थापक मंडळाचे सभासद, सन्माननीय चिटणीस, उपाध्यक्ष, अध्यक्षा अशा विविध महत्त्वाच्या पदांवर होत्या. गावदेवी देवस्थानच्या सहकार्याने ‘बालसंस्कार केंद्राची सुरुवात गुलाब गोरेगावकर यांच्यामुळे झाली. ज्येष्ठजनांना त्यांच्या समवयस्कांबरोबर काही क्षण आनंदात जावेत या उद्देशाने श्री ग्रामदेवी देवस्थानच्या सहयोगाने त्यांनी श्री ग्रामदेवी देवस्थानात १९८० मध्ये ‘ज्येष्ठजन केंद्रा’ची स्थापना आपले पती वसंतरावांच्या सहकार्याने केली. तसेच त्यांनी १९९४ सालापर्यंत देवस्थानात वेगवेगळे उपक्रम राबविले. ज्ञातीबांधवांतर्फे त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन समाजसेवक कै. कृष्णराव रामचंद्र देसाई गौरव स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. त्यांची सध्या जन्मशताब्दी असून त्यानिमित्त समाजातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘गुलाब वसंत गोरेगावकर स्मारक निधी’ या संस्थेतर्फे शालान्त परीक्षेत सर्वप्रथम येणाऱया पाठारे क्षत्रिय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मानस आहे.

आपली प्रतिक्रिया द्या